नागपूर :- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व एडुसन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी, जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाचगाव उमरेड, येथे किशोरवयीन मुली व मुलांसाठी “बालकांचे हक्क व संरक्षण यात युवकांची भूमिका” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन मोटघरे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण व एडुसन फाऊंडेशनचे संचालक निलेश काळे व पाचगाव येथील सरपंच चेतन फटींग उपस्थित होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना बालहक्कांविषयी सविस्तर माहिती देणे, बालकांचे संरक्षण, शिक्षणाचा अधिकार, बालमजुरी प्रतिबंध, बालविवाह रोखणे तसेच बालकांवरील अत्याचार प्रतिबंध याबाबत जागृत करणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. मुख्य मार्गदर्शक मुश्ताक पठाण यांनी युवकांनी समाजामध्ये सजग नागरिक म्हणून कशी भूमिका पार पाडावी, तसेच लघुचित्रपटाद्वारे बाल संरक्षण अधिकारांची माहिती देत विद्यार्थिनींना सजग राहण्याचा संदेश दिला.
केंद्र शासनाच्या “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या अभियाना विषयीसुद्धा विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. बाल संरक्षण अधिकारी साधना ठोंबरे यांनी वास्तव जीवनातील घडणाऱ्या घटना व अनुभवांद्वारे बाल संरक्षण अधिकारांचे महत्त्व प्रभावीपणे विषद केले. एडुसन फाऊंडेशनचे संचालक निलेश काळे यांनी विद्यार्थिनींना शिक्षणासोबतच संस्कृती व सांस्कृतिक मूल्यांचे महत्त्व पटवून दिले व सोशल मीडिया व मोबाईलचा योग्य व जबाबदारीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. पाचगावचे सरपंच चेतन फटिंग यांनी बाल संरक्षणाचे महत्त्व उत्तमपणे अधोरेखित केले.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे देत त्यांना योग्य दिशा दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभा शिरपुरे तर आभार भाग्यश्री भोयर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष व एडुसन फाऊंडेशनचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षक वर्षा रंदई, वंदना भेंडे व कर्मचारी यांनी सहकार्य केले.