किशोर साहू, मौदा :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्याच्या अनुषंगाने जि प प्राथमिक शाळा तोंडली येथे 14 एप्रिल रोजी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने शाळेचे बाल वाचनालय सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सलग पाच तास वाचन उपक्रमासाठी खुले करण्यात आले होते .या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका ,शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक,गावातील विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या अभ्यास वाचन कार्यक्रमाचा उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञान प्रेम वाचनाची आवड, शिस्तबद्धता आणि कठोर परिश्रमाच्या मूल्यांना उजाळा देणे हा होता. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे तर सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करावे. संविधानातील मूल्यांचा अवलंब करून सुसंस्कृत नागरिक होण्याचा प्रयत्न करावा, वाचनाची आवड जोपासून आपले ज्ञान नेहमी वृद्धिंगत करावी हा संदेश या उपक्रमातून दिला.



