– महापौर निता ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या प्रलंबित असलेल्या समस्या तातडीने निकाली लावण्याचे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात बुधवारी (ता.१५) सफाई कामगारांच्या विविध समस्यांबाबत आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला राज्य सफाई कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष सतीश डागोर, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी-वखरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, आरोग्य व वैद्यकीय विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, अतिरिक्त आयुक्त अंकित, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त राजेश भगत, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय समाज कल्याण विभागाचे उपायुक्त प्रसाद कुळकर्णी, सहायक आयुक्त सुकेशणी तेलगोटे, सहायक आयुक्त श्याम कापसे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी आणि सफाई कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी राज्य सफाई कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष सतीश डागोर यांनी महापौर निता ठाकरे यांना लाड-पागे समितीच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली. सफाई कामगारांचे १९७५ पासून ते सद्यस्थितीपर्यंत असलेले प्रलंबित प्रकरणे, खारीज प्रकरणे, ऐवजदार आणि अधिसंख्य प्रकरणे मार्गी लावण्याकरिता सकारात्मक विचार करण्यात यावा. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी यासाठी झोन स्तरावर किंवा मनपा शाळांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करावी, असेही त्यांनी सुचविले. यासोबतच मनपा सफाई कर्मचाऱ्यांच्या घरकुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, त्यांच्या कुटुंबीयांना कॅशलेस वैद्यकीय प्रतिपूर्ती सुविधा, आरोग्य विमा योजना लागू करावी आणि रिक्त पदांची भरती करण्याबाबत मनपाने सकारात्मक निर्णय घ्यावा, आदी मागण्या सतीश डागोर यांनी बैठकीत मांडल्या.
यावर महापौर निता ठाकरे यांनी सफाई कामगारांचे सर्व प्रलंबित प्रकरण तातडीने सोडविण्यात येईल असे आश्वासन सतीश डागोर यांना दिले. तसेच मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी देखील प्राधान्यक्रमानुसार सफाई कामगारांचे सर्व समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे सांगितले.



