– कामठी फार्मसी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन
कामठी :- श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी द्वारा संचालित श्रीमती किशोरीताई भोयर काॅलेज आॅफ फार्मसी कामठी तसेच एसकेबी काॅलेज ऑफ फार्मसी गादा, कामठी या महाविद्यालयाचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन क्षितीज २०२६ चे दिनांक १६ एप्रिल २०२६ ला सकाळी स्व वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे थाटात उद्घाटन करण्यात आले.
कामठी फार्मसी महाविद्यालय हे मध्य भारतातील औषधीनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमात शिक्षण देणारे अग्रगण्य महाविद्यालय आहे. शैक्षणिक तसेच संशोधनात्मक कार्याकरीता एक नामांकित संस्था असून सांस्कृतिक कार्यक्रमाकरीता देखील संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे.
आपल्या या सांस्कृतिक वारस्याचे जतन करीत दरवर्षी प्रमाणे महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती किशोरी भोयर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ श्रीधर येशामैना, उपाध्यक्ष – ग्लोबल पेशंट सेफ्टी, अॅमनेल फार्मास्युटिकल्स, डॉ राहुल सोमाणी यांच्या शुभहस्ते तसेच संस्थेचे सचिव सुरेश भोयर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर, डॉ अतुल हेमके, ल्युपिन फार्मास्युटिकल चे अरविंद रायकवार, किरण देशमुख, प्रणबकुमार पांडा, विजय टाटा, विद्यार्थी परिषदेचे अधिष्ठाता प्राध्यापक राधेश्याम लोहिया यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी फार्मसी विद्यार्थी परिषदेचे अवियांश तिवारी, गुलमेहेक खुराणा, गौरव हाटेकर, कामाक्षी गजभिये उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या स्थापनेपासून सविस्तर माहिती विशद केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ज्यात विशेष म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ राहुल सोमाणी यांनी प्रेझेंटेशन च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा मागोवा प्रस्तुत करून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी संबोधित मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ल्युपीन लिमी नागपूर यांच्यातर्फे अंतिम वर्षातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना कंपनीच्या उपस्थित अधिकारी मान्यवरांच्या हस्ते ल्युपीन स्काॅलर अवार्ड प्रदान करण्यात आला. ज्यात यावर्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी केतन येडे आणि पदवी अभ्यासक्रमातून आयुष हेडाऊ या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या एसकेबी फार्मा-बुलेटीन चे विमोचन करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील कार्यरत शिक्षक प्राध्यापक वृंद यांना त्यांच्या १०, १५, २५ वर्षे कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करुन उत्कृष्ट संशोधन, विविध प्रकल्प संशोधन अनुदान तसेच संशोधन प्रकाशन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर तसेच संस्थेचे सचिव सुरेश भोयर यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही बजाज आणि ऐश्वर्या सोलंकी यांनी तर आभारप्रदर्शन विद्यार्थी परिषदेचे अधिष्ठाता प्राध्यापक राधेश्याम लोहिया यांनी केले.
याव्यतिरिक्त दोन दिवसीय स्नेहसंमेलन’क्षितीज’अंतर्गत विद्यार्थ्यांद्वारे नाटक, वादविवाद स्पर्धा, नृत्य, गायन, प्रश्नमंजुषा, फॅशन शो, व्यक्तिमत्त्व स्पर्धा, मुकनाट्य इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचा समारोप दि. १७ एप्रिल ला बक्षीस वितरणाद्वारे करण्यात येईल. या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांच्या मार्गदर्शनात फार्मसी विद्यार्थी परिषद तसेच सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी अथक प्रयत्न करीत आहेत.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या मुख्य उद्देशाने मागील २५ वर्षांपासून अश्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. औषधीनिर्माणशास्त्र सारख्या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं हा या आयोजनामागील उद्देश असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांनी यावेळी सांगितले.



