हंसराज,भंडारा सिहोरा :- मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या एका ५२ वर्षीय महिलेचा वन्यप्राण्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १७ एप्रिल रोजी सिहोरा नजीकच्या धनेगाव परिसरात घडली. साधना सीताराम उईके (रा. धनेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साधना उईके या बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास गावाशेजारील शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेल्या होत्या. दररोज दुपारी त्या घरी परतत असत, मात्र काल दुपार उलटूनही त्या न परतल्याने कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. बराच वेळ वाट पाहूनही त्या न आल्याने नातेवाईक आणि गावकऱ्यांनी शोधमोहीम हाती घेतली. शोध घेत असताना गावाजवळील जंगल शिवारात त्यांचा छिन्न-विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा भीषण प्रकार पाहून गावकऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला.
साधना उईके यांच्यावर नेमका कोणत्या प्राण्याने हल्ला केला, याबाबत सध्या परिसरात संभ्रम आहे. घटनास्थळावरील परिस्थिती आणि मृतदेहाची अवस्था पाहता हा हल्ला अत्यंत भीषण होता हे स्पष्ट होते. मात्र, हल्ला करणारा प्राणी वाघ होता की बिबट्या, हे वनविभागाच्या पंचनाम्यानंतर आणि शवविच्छेदन अहवालानंतरच अधिकृतपणे स्पष्ट होणार आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे धनेगाव आणि परिसरातील शेतकरी व मजुरांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. सध्या मोहफुले वेचण्याचा हंगाम सुरू असल्याने अनेक नागरिक पहाटे जंगलात जातात. “आम्ही पोटापाण्यासाठी बाहेर पडायचे की नाही? वन्यप्राण्यांच्या दहशतीत जगायचे कसे?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
वनविभागाने तात्काळ या नरभक्षक प्राण्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करावे आणि पीडित कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून, वनविभागाच्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



