अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ७३ वर्षीय नराधमाला २० वर्षांचा सश्रम कारावास; भंडारा जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

0
42

हंसराज,भंडारा लाखनी :- लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या ७३ वर्षीय आरोपीला भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षांच्या सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. आसाराम दोडकु कुळमते (रा. दिघोरी/नानोरी, ता. लाखनी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

सदर धक्कादायक घटना १२ मार्च २०२३ ते २२ मार्च २०२३ या कालावधीत मौजा दिघोरी/नानोरी येथे आरोपीच्या राहत्या घरी घडली होती. ७३ वर्षीय आरोपी आसाराम कुळमते याने फिर्यादीच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या अत्याचारामुळे पीडित मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिली. सोनोग्राफी रिपोर्ट आणि पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मार यांच्या न्यायालयात पार पडली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता दुर्गा तलमले यांनी प्रभावी युक्तिवाद केला. वैद्यकीय पुरावे आणि महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्षीवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २३५ (२) अंतर्गत, कलम ३७६ (३) भादंवि आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास आणि एकूण ३७,००० रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी केला. त्यांनी अत्यंत कमी वेळात भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणातील यशस्वी दोषसिद्धीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे, आणि लाखनीचे ठाणेदार सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काम केले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद गिरी (प्रभारी अधिकारी, दोषसिद्धी कक्ष) आणि कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस हवालदार प्रमोद कमाने यांनी न्यायालयीन कामकाजात मोलाची भूमिका बजावली.

या निकालामुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा जरब बसेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.