– दोन अज्ञात आरोपींविरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल
सिहोरा :- सिहोरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हरदोली (सि.) येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका २४ वर्षीय तरुणावर दोन अज्ञात इसमांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. सिहोरा पोलिसांनी याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू बन्सीलाल राऊत (वय २४, रा. हरदोली, ता. तुमसर) हा तरुण १७ एप्रिल रोजी रात्री आपल्या मोठ्या वडिलांच्या (रतन राऊत) घराच्या अंगणात खाटेवर झोपलेला होता. रात्री १० ते पहाटे २ च्या सुमारास दोन अज्ञात इसम तिथे आले. त्यांनी राजू काही समजण्याच्या आत त्याच्या अंगावरील ब्लँकेट (कंबल ) त्याच्या तोंडावर व डोळ्यावर दाबले. त्यानंतर कोणत्यातरी लहान ब्लेडसारख्या धारदार वस्तूने त्याच्या गळ्यावर आणि गालावर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
या हल्ल्यानंतर जखमी राजूला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. त्याने दिलेल्या बयाणावरून आणि वैद्यकीय अहवालावरून सिहोरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १६४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११८(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक हरिदास सुरपाम करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस हवालदार कासदा यांनी पार पाडली, तर पोलीस हवालदार साईराम गयगये यांनी फिर्यादीच्या बाजूने सहकार्य केले.
भरवस्तीत मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे गावात भीतीचे सावट आहे. हे हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी हा हल्ला कोणत्या कारणातून केला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलीस आरोपींच्या मागावर असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.



