तुमसरात आयपीएल क्रिकेट जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड; १० लाख ५६ हजारांच्या मुद्देमालासह नागपुरातील दोन बुकी अटकेत

0
46

हंसराज,भंडारा तुमसर :- सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावून हार-जितचा जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. तुमसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी नागपूर येथील दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विक्रम उर्फ विक्की प्रभाकर टेभरे (वय २८, रा. पुनापूर घाट पारडी, नागपूर) आणि रजत घोतगारे (वय ३५, रा. मानकर वाडी पारडी, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी आयपीएल सामन्यांवर लोकांकडून सट्टा घेत असताना रंगेहात मिळून आले.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात ५६ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन, ५१० रुपये रोख, जुगाराच्या नोंदी असलेले पुस्तक आणि पेन, तसेच १० लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण १० लाख ५६ हजार ५४३ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात अ. क्र. ५५२/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, पुढील तपास तुमसर पोलीस अधिकारी करीत आहेत.