हंसराज भंडारा :- जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आगामी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या आयोजनाच्या तयारीबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिनस्त अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीत जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी सर्व विभागप्रमुख व पोलीस अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आवश्यक सूचना व निर्देश दिले. महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्धपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत कार्यक्रम स्थळाची व्यवस्था, परेड, मान्यवरांची उपस्थिती, वाहतूक नियोजन याबाबत तसेच उन्हाळ्याच्या दृष्टीने व तापमान पाहता कार्यक्रम आटोपशीर ठेवण्याबाबतव इतर अनुषंगिक बाबींवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करून वेळेत तयारी पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांच्या सह पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच महसूल, शिक्षण, आरोग्य व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

