मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांचे प्रतिपादन
नागपूर ता.२४ : नागपूर महानगरपालिकेतर्फे महिलांच्या सक्षमीकरणसाठी प्रयत्न केले जात आहे. महिलांना विविध संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. पण या प्रशिक्षणासाठी महिलांनी सातत्य आणि शिस्त ठेवण्याची गरज आहे. तसेच रोजगारासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि मेहनतीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मनपा अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी आज येथे केले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशनानुसार अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी.यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (ता.२३) दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित बचत गटातील महिला व त्यांच्या कुटुंबातील मुली यांना कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, या हेतूने कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था व बचत गटातील महिलांची कार्यशाळा पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. मार्गदर्शन करीत बोलत होत्या. कार्यशाळेत ५२ महिला उपस्थित होत्या.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या कार्यशाळेत समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, समाज विकास विभागाचे अधीक्षक राजेश मेश्राम, मिटकॉनच्या संचालक सोनाली मिश्रा, वेदिक इंजिनियरिंगच्या संचालक भावना देशपांडे, समाज विकास विभागाचे विनय त्रिकोलवार, नुतन मोरे, बांते यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेत महिलांना बेड साईड असिस्टंट आणि ड्रोन हाताळण्याबाबत प्रशिक्षणाची माहिती कौशल्य प्रशिक्षण संस्थामार्फत माहिती देण्यात आली.


