spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शहरातील दहनघाट टप्प्याटप्प्याने पर्यावरण पूरक होणार

शहरातील वायू गुणवत्ता नियंत्रणासाठी उचलण्यात येणार विविध पावले

नागपूर, ता. २४ : नागपूर महानगरपालिका शहरातील दहनघाट टप्प्याटप्प्याने पर्यावरणपूरक करून वायू गुणवत्ता नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्णय वायू प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा राबविण्यासाठी शहर स्तरावरील समितीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत, मुख्य अभियंता  मनोज तालेवार, उपायुक्त  राजेश भगत, उपायुक्त  गणेश राठोड, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहाय्यक पोलीस आयुक्त  माधुरी बाविस्कर, निरीच्या प्रतिनिधी डॉ. पद्मा राव,  संगीता गोयल, एमपीसीबीच्या  शीतल उधारे, कार्यकारी अभियंता सर्वश्री. रवींद्र बुंधाडे, राजेश गुरमुले  राजेश दुफारे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, उद्यान अधीक्षक  अमोल चौरपगार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत वायू गुणवत्ता सुधारणा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. तसेच सन २०२५-२६ मध्ये करावयाच्या वायू गुणवत्ता सुधारणाच्या दृष्टीने आवश्यक विकास कामांचे नियोजन करण्यात आले. या संदर्भातील अहवाल राज्य स्तरावरील वायू गुणवत्ता नियंत्रण समितीकडे पाठविण्यात येणार आहे.

पर्यावरण पूरक दहनघाटांसाठी ५ कोटी

शहरातील सर्व दहनघाटांवर वायू गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली बसविण्यात येणार आहे. सध्या नागपूर शहरात गंगाबाई घाट, मोक्षधाम व मानेवाडा दहन घाटावर वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली बसविण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच ज्या दहनघाटांवर शवांचे दहन अधिक होत आहे. त्या दहन घाटांवर टप्याटप्याने वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली उभारण्यात येईल. पहिल्या टप्प्यात तीन दहनघाटांवर ही व्यवस्था उभारण्यात येणार आहे. यासाठी २०२५-२६ या वर्षात ५ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येईल.

तसेच नागपूर शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. नागपूर शहरातील हॉट स्पोट परिसरात प्रायोगिक तत्वावर स्प्रिंकलर्सद्वारे पाण्याची फवारणी केली असता वायू प्रदूषणात घट झाल्याचे नीरी संस्थेने केलेल्या निरीक्षणात आढळून आले आहे. तसेच शहरातील ज्या भागामध्ये अधिक वायू प्रदूषण आहे. त्या ठिकाणी स्प्रिंकल्स लावण्यासाठी २ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हरीत स्थळे विकसित करण्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात केली जाणार आहे. यावेळी सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या आर्थिक वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेण्यात सुरू असलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले. याप्रसंगी  डॉ. संदीप नारनवरे,  संदीप लोखंडे, कार्यकारी अभियंता  प्रशांत सोनकुसरे, उपअभियंता राहुल देशमुख आदी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.