spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘सिंदूर’चा सांगावा…

आज ऑपरेशन सिंदूरसारखी कारवाई खरोखरच करता येईल का, याविषयी गांभीर्याने विचार झाला पाहिजे. कारण ‘त्या’ वेळचा आणि आजचा पाकिस्तान यांत फरक आहे.

पहलगाममधील नृशंस दहशतवादी हल्ल्याला (२२ एप्रिल) प्रतिसाद म्हणून भारताने ७ मे रोजी पहाटे १ ते १.२५ या काळात पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्या कारवाईस नाव दिले गेले ‘ऑपरेशन सिंदूर’. ती अर्थातच २५ मिनिटांत संपणार नव्हती. कारण पाकिस्तानही तयारीत होता आणि त्यातून त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर हल्ले-प्रतिहल्ल्यांचे धोकादायक लघुपर्व सुरू झाले, जे १० मे रोजी सायंकाळी थांबले. आज ७ मे रोजी या कारवाईस एक वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्ताने कारवाईशी संबंधित भारताच्या सामरिक, राजनयिक आणि राजकीय धोरणांचा आढावा घेणे समयोचित ठरते. ही कारवाई थांबवलेली नसून, तीस केवळ विराम देत असल्याचे भारताने त्यावेळी जाहीर केले होते.

याचा अर्थ आजही तशा स्वरूपाचा दहशतवादी हल्ला भारतात काश्मीर किंवा इतर कुठेही घडला तर ‘ऑपरेशन सिंदूर’ फेरकार्यान्वित होईल. ती वेळ येऊ न देण्यासाठी खबरदारी घेणे हे आपल्यासाठी अधिक श्रेयस्कर. कारण युद्ध आणि युद्धसदृश कारवायांनी प्रश्न सुटत नाहीत आणि युद्धेही संपुष्टात येत नाहीत हे रशिया-युक्रेन, अमेरिका/इस्रायल-इराण आणि बराच काळ इस्रायल-हमास संघर्षाच्या निमित्ताने आपण पाहात आलो आहोत. अशा संघर्षांमध्ये कोणत्याही एका देशाचा किंवा समूहाचा निर्णायक विजय होत नाही, मात्र त्यानिमित्ताने होणार्‍या अग्निवर्षावात कित्येक अश्राप जीव भस्मसात होतात, रोजगार बेचिराख होतात, अर्थव्यवस्थांना दीर्घकालीन पंगुत्व येते.

जागतिकीकरणाच्या घुसळणीत अशा संघर्षांतून अनेकदा सागरी व्यापारी मार्ग असुरक्षित बनतात, हवाई मार्ग बंद होतात आणि अर्थाभिसरण गोठते. चर्चा आणि सामोपचारानेच सुटू कोणतेही वाद शकतात, ही भारताची भूमिका ६० वर्षांपूर्वीही होती नि आजही आहे. या पार्श्वभूमीवर शस्त्रास्त्रसज्ज राहून आणि कुरापतखोर शेजार्‍यावर हल्ले करून त्यास जरब बसवण्याची रणनीती खरोखरच फलदायी ठरते का, याचा विचार सिंदूर कारवाईच्या वर्षपूर्तीनिमित्त होणे आवश्यक.

तरीदेखील २०१९ मध्ये ‘पुलवामा’ घडलेच. त्यावेळी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा या प्रांतातील बालाकोटमध्ये भारताने तेथील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. हे हल्ले थेट पाकिस्तानच्या भूमीत घडले. त्यानंतरही काही वर्षांनी ‘पहलगाम’ घडलेच. त्यामुळेच ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घ्यावे लागले. यातून मिळालेला एक महत्त्वाचा धडा म्हणजे, पाकिस्तानी भूमीवर लष्करी कारवाया करूनही त्या देशाचा दहशतवादी कुरापतींचा कंड शमत नाही. किंबहुना, अशा प्रकारे भारताच्या प्रतिहल्ल्यांनाही तो देश सरावू लागल्याचे दिसून येत आहे.

नरेंद्र मोदी यांचे सरकार सन २०१४ मध्ये केंद्रात प्रथम सत्तारूढ झाल्यानंतर काश्मीर आणि पाकिस्तानबाबत अधिक रोखठोक धोरण अंगीकारण्याकडे कल दिसून येतो. कोणतेही नवे सरकार, जुन्या धोरणांचा फेरविचार करतच असते त्यामुळे या पवित्र्यामध्ये गैर काहीच नाही. मात्र, पाकिस्तानबाबत ‘घर में घुस के…’ धोरणातून प्रत्यक्षात पलीकडून होणारे हल्ले खरोखरीच थांबले का या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. कारण २०१६ मध्ये उरी येथे लष्करी आस्थापनेवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडून पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक केले. ती भारताची व्याप्त काश्मीर भागात केलेली आणि युद्ध किंवा व्यापक संघर्षाच्या चौकटीबाहेरील कित्येक वर्षांतील पहिली कारवाई ठरली.

ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये लढाऊ विमानांचा वापर करताना आपल्याकडून काही व्यूहरचनात्मक त्रुटी झाल्या, अशी कबुली खुद्द सैन्यदल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनीच पुढे सिंगापूरमधील एका वार्तालापात दिली होती. त्या सुधारून पुढे भारताने हल्ले तीव्र केले नि आपल्याकडे क्षेपणास्त्र व ड्रोन बचाव प्रणाली सुसज्ज ठेवली, त्यामुळे पुढील कारवाईत भारताचाच वरचष्मा राहिला. ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्यात भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये मुझफ्फराबाद, कोटली, तसेच पाकिस्तानच्या पंजाबमधील बहावलपूर, सियालकोट, मुरीदके या ठिकाणचे दहशतवाद्यांचे तळ किंवा जैश, लष्कर-ए-तैय्यबासारख्या संघटनांची मुख्यालये यांना लक्ष्य करण्यात आले. बहुतेक सर्व लक्ष्यांचा काही क्षणांत चुराडा झाला. पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना लक्ष्य करणार नाही, हे आपण सुरुवातीसच स्पष्ट केले होते.

दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणे किंवा नंतर पाकिस्तानचे प्रतिहल्ले परतावून लावणे यांत आपण यशस्वी ठरलो. मात्र पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात दहशतवादाच्या मुद्द्यावर एकटे पाडण्याचा आपला इरादा त्यावेळी फारसा यशस्वी ठरला नाही. भारताची लढाऊ विमाने पाडली, हे कथानक पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये खुबीने पेरले आणि मुरवले. आपण मात्र काहीसे प्रतीकात्मकतेच्या आहारी गेलो. यातूनच मोहिमेचे नामकरण ‘सिंदूर’ या सौभाग्यद्रव्यावर आधारित असणे, किंवा रोजच्या रोज कारवाईची माहिती देण्यासाठी महिला सैन्यदल अधिकार्‍यांची नियुक्ती करणे याला प्राधान्य दिले गेले.

आपली नेमकी किती लढाऊ विमाने पाडली गेली, त्यात राफेलसारख्या नवीनतम लढाऊ विमानांचा समावेश होता का, याविषयी बोलण्यास आपण मुखरलो. भावनाप्रधान प्रतीकात्मकतेची एक जागा असते. पण युद्धजन्य कारवाईच्या काळात, आंतरराष्ट्रीय राजकारणात, माध्यमयुद्धात चटपटीत चलाखीची गरज असते. ती दाखवण्यात आपण कमी पडलो. पाकिस्तानचे अनेक लष्करी तळ आपण उद्ध्वस्त केले, रडार यंत्रणा निकामी केल्या. यासाठी ब्रह्मोससारखी क्षेपणास्त्रे किंवा आकाशतीर, एस-४०० सारख्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा खुबीने वापरल्या. रावळपिंडी या पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयाच्या नगरीत भारतीय क्षेपणास्त्रे जाऊन आदळली.

सुरुवातीस थोडी नामुष्की, पण नंतरचा झपाटा असे या कारवाईचे स्वरूप असावे. आपण नामुष्की झाकण्याच्या प्रयत्नात कदाचित झपाट्यालाही पुरेशी प्रसिद्धी देण्यात कमी पडलो. त्यामुळे मध्यम प्रवाहातील, जबाबदार पाश्चिमात्य माध्यमांमध्ये आजही ‘ऑपरेशन सिंदूर’चे वर्णन ‘अनिर्णित’ (स्टँड-ऑफ) याच शब्दांमध्ये केले जाते. आपल्यासाठी ती कारवाई ‘निर्णायक’ असणे अपेक्षित होते. बाहेरील माध्यमांना मात्र तसे वाटले नाही. अखेरच्या टप्प्यात पाकिस्तान युद्धविरामासाठी अजिजी करत असताना, आपल्या सगळ्याच शीर्षस्थ यंत्रणांनी – परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय – प्रतिसाद देण्यात थोडा अवधी घेतला आणि युद्धविरामाचे श्रेय दस्तुरखुद्द डोनाल्ड ट्रम्प यांना पळविण्याची संधी दिली! त्यानंतर जवळपास ३०हून अधिक वेळा ट्रम्प साहेबांनी युद्धविरामाचे श्रेयापहरण करून झाले नि आपण त्याही वेळी गप्पच राहिलो! आज ऑपरेशन सिंदूरसारखी कारवाई खरोखरच करता येईल का, याविषयी गांभीर्याने विचार झाला पाहिजे. कारण ‘त्या’ वेळचा पाकिस्तान आणि आजचा पाकिस्तान यांत फरक आहे.

ट्रम्प आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख सैय्यद असिम मुनीर यांचा दोस्ताना जगजाहीर आहे. जागतिक राजकारणाचा पोत इतक्या झपाट्याने बदलला आहे, की आता पाकिस्तानसारखा युद्धखोर, कुरापतखोर देश शांततेसाठीच्या वाटाघाटींचे केंद्र बनलेला दिसतो. असिम मुनीर हे आजवरच्या पाकिस्तानच्या लष्करशहांपेक्षा अधिक पाताळयंत्री, अधिक भारतद्वेष्टे लष्करप्रमुख ठरतात. अमेरिकेने यापूर्वीही पाकिस्तानी लष्करशहांना गोंजारले, भारताला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळचे अध्यक्ष किमान ट्रम्प यांच्याइतके आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत बेफिकीर तरी नव्हते. त्यामुळे ट्रम्प-मुनीर हे अजब आणि घातक संयुग ठरते. यातून मुनीर अधिक बेरकी बनू शकतात.

भारतभूमीवर नवी काही कुचाळकी करू शकतात. भारतीय नेतृत्वाला याची जाण असेलच. एकीकडे आपण शस्त्रसज्जतेबाबत आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या कृतीत सातत्य ठेवले पाहिजे, दुसरीकडे, काश्मीरसारख्या संवेदनशील प्रदेशांत स्थानिक जनतेच्या मनात अधिकाधिक विश्वास निर्माण करण्याची प्रक्रियाही सुरू ठेवली पाहिजे. निवडणुकीय यशोत्सवात ‘ऑपरेशन सिंदूर’चा हा सांगावा विस्मृतीत जाणे हितकारक नाही.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.