spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत संघभावना, संयम आणि सातत्यपूर्ण काम आवश्यक – निवृत्त आयपीएस अधिकारी आशिष गुप्ता

मुंबई :- शासन अथवा खासगी कोणताही नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविताना सायबर सुरक्षा, डेटा एन्क्रिप्शन आणि गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असून नाविन्यपूर्ण प्रकल्पावर काम करणा-या टीममध्ये संघभावना, संयम आणि सातत्यपूर्ण काम करणे आवश्यक असल्याचे मत निवृत्त आयपीएस अधिकारी आशिष गुप्ता यांनी व्यक्त केले. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी २.०’ उपक्रमांतर्गत ‘इम्प्लिमेंटेशन ऑफ लार्ज आयटी प्रोजेक्ट्स अँड प्रोक्युअरमेंट्स’ या विषयावरील विशेष व्याख्यानात गुप्ता बोलत होते.

आशिष गुप्ता यांनी, आजचे युग हे पूर्णपणे डिजिटल डेटाचे युग असल्याचे सांगितले. “आज प्रत्येक व्यक्ती नकळत शेकडो डिजिटल फूटप्रिंट्स तयार करत आहे. मोबाईल वापरण्यापासून विमान तिकीट बुकिंग, ऑनलाइन खरेदी, सोशल मीडिया वापर, सीसीटीव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म्सपर्यंत प्रत्येक गोष्ट डेटा निर्माण करत आहे,” असे त्यांनी नमूद केले. दररोज जगभरात प्रचंड प्रमाणात डेटा निर्माण होत असून २०२५ मध्ये दररोज ४६३ एक्साबाइट डेटा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. “डेटा साठवण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. मोठ्या डेटा सेंटरमुळे ऊर्जा वापर आणि कार्बन उत्सर्जन वाढत आहे. त्यामुळे डेटा व्यवस्थापन ही केवळ तांत्रिक नव्हे तर पर्यावरणीय बाबही बनली आहे,” असेही ते म्हणाले.

आशिष गुप्ता म्हणाले की, शासन विविध सेवा अधिक परिणामकारकपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या आयटी प्रकल्पांचा वापर करीत आहे. जीएसटी नेटवर्क, आयआरसीटीसी, आधार, राष्ट्रीय सुरक्षा प्रणाली, नागरिक डेटा हब यासारख्या प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, विविध विभागांचा डेटा एकत्र आणून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देता येतात.मोठ्या आयटी प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञानाची भीती बाळगण्याची गरज नाही., “तंत्रज्ञान तज्ज्ञ सॉफ्टवेअर तयार करू शकतात; मात्र कोणत्या विभागाला काय आवश्यक आहे, हे त्या विभागातील अधिकाऱ्यांनाच माहिती असते. त्यामुळे अधिकारी हेच त्या क्षेत्रातील डोमेन एक्स्पर्ट असतात.” एखादा अधिकारी अन्न व नागरी पुरवठा विभागात असेल, तर लाभार्थी, रेशन व्यवस्था, वितरणातील अडचणी याची खरी माहिती त्यालाच असते. तंत्रज्ञ फक्त त्यानुसार प्रणाली विकसित करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

आशिष गुप्ता म्हणाले की, मोठे आयटी प्रकल्प राबविताना तंत्रज्ञान तज्ज्ञ, प्रोक्युअरमेंट टीम, वित्तीय सल्लागार, डोमेन एक्स्पर्ट आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट टीम यांचा समन्वय अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.“फक्त तांत्रिक ज्ञान पुरेसे नसते. वित्त विभागाने प्रगत आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. तसेच प्रकल्पात सहभागी सर्व घटकांमध्ये विश्वास आणि संवाद निर्माण करणे हे नेतृत्वाचे महत्त्वाचे काम असते,” असे ते म्हणाले. आयटी प्रकल्पांची अंमलबजावणी करताना ‘थिंक बिग, डिलिव्हर स्मॉल’ ही संकल्पना महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. मोठा प्रकल्प एकाचवेळी पूर्ण करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने सेवा सुरू केल्यास चुका दुरुस्त करणे आणि सुधारणा करणे सोपे जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

आशिष गुप्ता म्हणाले की, “मला समजत नाही, कृपया सोप्या भाषेत समजावून सांगा, असे विचारण्यात काहीही कमीपणा नाही,” असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी सतत प्रश्न विचारण्याचा सल्ला दिला. तंत्रज्ञानातील संज्ञा आणि प्रक्रियांना सोप्या उदाहरणांतून समजून घेण्याचा प्रयत्न करावा, ‘एमपीएलएस नेटवर्क’, ‘एपीआय’, ‘एनओसी’, ‘एसओसी’ यासारख्या संज्ञा सोप्या उदाहरणांनी स्पष्ट केल्या. मोठ्या आयटी प्रकल्पांमध्ये ‘डेटा मॅच्युरिटी असेसमेंट’ अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विविध विभागांकडील डेटा वेगवेगळ्या स्वरूपात असल्याने त्याचे एकत्रीकरण करताना अडचणी निर्माण होतात.

आशिष गुप्ता म्हणाले की, मोठ्या आयटी प्रकल्पांमध्ये केवळ सर्वात कमी दर देणाऱ्या कंपनीची निवड करणे धोकादायक ठरू शकते, असे सांगताना त्यांनी ‘क्वालिटी अँड कॉस्ट बेस्ड सिलेक्शन’ पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. “तंत्रज्ञान प्रकल्पांमध्ये गुणवत्ता महत्त्वाची असते. त्यामुळे केवळ कमी किंमत नव्हे, तर गुणवत्तेलाही प्राधान्य दिले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानाची भीती न बाळगता नव्या गोष्टी शिकण्याचा आणि शासनाच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचा संदेश दिला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.