– मिरा – भाईंदरमधील सरकारची एक इंचही जमीन बिल्डरांना मिळणार नाही
– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली ग्वाही
मुंबई :- मिरा – भाईंदर येथील राज्य सरकारची एक इंचही जमीन बिल्डरच्या घशात जाऊ दिली जाणार नाही. त्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंतही लढू. ज्याप्रमाणे पत्रा चाळ घोटाळ्यातील दोषींना तुरुंगात टाकले तसे इथेही आरोपींना तुरुंगात टाकले जाईल. कुठल्याही बिल्डरला पाठीशी घालायला हे काही महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचे सरकार नाही, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी तोफ डागली.
मिरा-भाईंदर रोड प्रकरणांमध्ये राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात धाव घेईल आणि कुठल्याही बिल्डरच्या घशामध्ये सरकारी जमीन जाऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहिरपणे मांडल्याचे नमूद करीत बन म्हणाले की, यासाठी सरकारच्या वतीने पूर्णपणे प्रयत्न केले जातील. न्यायालयात सरकार लढेल आणि जिंकेलही. पण ज्या पद्धतीने संजय राऊत हे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, हा न्यायालयाचा अपमान आहे. मेधा सोमैया यांच्या अवमान प्रकरणांमध्ये संजय राऊत यांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला की योग्य न्याय दिला आणि दुसऱ्या प्रकरणात न्यायालयाने विरोधात निर्णय दिला की न्यायालयाबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे हा ढोंगीपणा आहे, दुटप्पीपणा आहे
पश्चिम बंगालमध्ये भाजपाची परंपरा काय आहे, हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये. संजय राऊत, तुमची परंपरा 100 कोटी रुपये वसुलीची होती. दररोज शंभर कोटी रुपये वसुली करायचे ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाची परंपरा होती. ‘वाझे काय लादेन आहे का?’ असे म्हणण्याची परंपरा तुमची होती. कार्टून फॉरवर्ड केले म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडणे ही तुमची परंपरा होती. एवढेच नाही, तर कोविडमध्ये सर्वसामान्य माणूस मरत असताना प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची परंपरा महाविकास आघाडीची, संजय राऊत तुमची होती. सुवेंदू अधिकारी यांना भाजपाने मुख्यमंत्री केले, कारण त्यांच्यावरचे कुठलेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. आपल्यावरचे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि जेलवारीही झालेली आहे. हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे, असे बन यांनी बजावले.
राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीत फूट पडली आहे, हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. काँग्रेसने ”द्रमुक” च्या पाठीत खंजीर खुपसत तामिळनाडूमधील ‘टीव्हीके’ पक्षाला समर्थन दिले. संजय राऊत, तुम्ही आणि राहुल गांधी यांनी अनेक प्रादेशिक पक्षांच्या पाठीत असाच खंजीर खुपसलेला आहे. द्रमुक नेते वेळीच सावध झाले. आमचे संसद सदस्य काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, असे द्रमुक ने लोकसभा सभापतींना कळवून टाकले आहे. उद्धव ठाकरे यांच्याही पाठीत काँग्रेस खंजीर खुपसणार आहे. वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, ‘ज्या दिवशी माझी काँग्रेस होईल, त्या दिवशी माझे दुकान बंद करेन.” संजय राऊत, ती वेळ आली आहे. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा आपले दुकान बंद करा; अन्यथा एक दिवस राहून तुमच्या गटालाही टाळे लागल्याशिवाय राहणार नाही, असे बन यांनी सुनावले.