spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महालक्ष्मी सरस २०२६ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

· ५३५ उत्पादक स्टॉल्स आणि ८० खाद्यपदार्थ स्टॉल्स सहभागी, उत्पादनांची विक्रमी विक्री

मुंबई :- महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, २ मे पासून सुरू झालेल्या या प्रदर्शनात महिला बचतगटाच्या उत्पादनांची विक्रमी विक्री होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर आणि परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी दिली.

५३५ उत्पादक स्टॉल्स आणि ८० खाद्य स्टॉल्सचे आकर्षण

ग्रामविकास व पंचायत राज विभाग आणि उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या माध्यमातून ग्रामीण महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीकरीता राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मैदान, प्लॉट नं. जी-टेक्स्ट ब्लॉक १ ते ४, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई येथे करण्यात आले आहे.

यंदाच्या महालक्ष्मी सरसमध्ये ५३५ उत्पादक स्टॉल्स आणि ८० खाद्यपदार्थ स्टॉल्स सहभागी झाले आहेत. उत्पादनांची गुणवत्ता, पॅकेजिंग आणि नावीन्य लक्षात घेऊन सहभागींची निवड करण्यात आली आहे. नवोदित महिलांनाही मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली आहे. नागरिकांसाठी बस सेवा, घरपोच सेवा तसेच दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

४० कोटी रुपयांच्या व्यवसायाची अपेक्षा

याआधी नागपूर येथे झालेल्या प्रदर्शनामध्ये १६ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता, तर वाशी येथे २२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. मुंबईतील महालक्ष्मी सरस २०२६ पहिल्या सप्ताहात १५ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला असून, यंदा ४० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यातील ७१ लाख महिलांचा उमेद अभियानात सहभाग

मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी सांगितले की, २०११ मध्ये केंद्र शासनामार्फत सुरू झालेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे हा होता. २०१८ पासून महाराष्ट्रभर या अभियानाचा विस्तार करण्यात आला. गावागावांमध्ये महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असून, एका गावातील किमान दहा महिलांना एकत्र आणून बचतगट उभारण्यात आले.

महाराष्ट्रात आजपर्यंत ६ लाख ६८ हजार महिला बचतगटांची स्थापना झाली असून, त्यामध्ये ७१ लाखांहून अधिक महिलांचा सहभाग आहे. ग्रामीण भागात सुमारे ५५ टक्के आर्थिक सक्षमीकरण घडवून आणण्यात या अभियानाला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले. एकल महिला, तृतीयपंथी, दिव्यांग आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांनाही या अभियानामध्ये विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

महिलांना दीड लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य

परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी सांगितले की, महिलांना व्यवसायासाठी आवश्यक भांडवल कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंडच्या माध्यमातून दिले जाते.

याअंतर्गत यापूर्वी ६० हजार रुपये दिले जात होते; मात्र आता हा निधी वाढवून तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. महिलांच्या व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन गटस्तरावर निर्णय घेतले जातात. यासाठी कोणतीही जमीन किंवा सोने तारण घेतले जात नाही.

केवळ बचतगटांनाच नव्हे, तर वैयक्तिक महिलांनाही त्यांच्या गरजेनुसार कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. महिलांच्या घरगुती परिस्थितीचा, व्यवसायाच्या गरजांचा आणि आर्थिक स्थितीचा विचार करून त्यांना आर्थिक मदत केली जाते. यामुळे ग्रामीण भागातील सावकारी पद्धतीला आणि जास्त व्याजदराने पैसे देणाऱ्या अनधिकृत आर्थिक व्यवस्थांना मोठ्या प्रमाणावर आळा बसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

उमेद मार्ट मुळे महिलांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ

उमेद अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘उमेद मार्ट’ या ऑनलाईन व्यासपीठामुळे महिला बचत गटांची उत्पादने आता जागतिक स्तरावर पोहोचत आहेत. दोन वर्षांत या व्यासपीठावर ४२०० हून अधिक उत्पादने नोंदवण्यात आली असून, यावर्षी आणखी १००० नवीन उत्पादने समाविष्ट करण्यात आली आहेत. महिलांना डिजिटल विपणन आणि ऑनलाईन विक्रीचे विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

एक लाख ‘लखपती दीदी’ तयार करण्याचे उद्दिष्ट अभियानाने ठेवले असून, हा आकडा आणखी ५० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिलांना व्यवसाय, विपणन आणि आर्थिक स्वावलंबनासाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असे निलेश सागर यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.