spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जनगणना-२०२७ : १६ मे पासून घरयादी व घरगणना टप्पा राबविणार

– नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हा जनगणना अधिकारी आशिष वानखेडे

गडचिरोली :- जनगणना-२०२७ कार्यक्रमांतर्गत पहिला टप्पा म्हणजे घरयादी व घरगणना दिनांक १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या कामासाठी जिल्ह्यात प्रगणक व पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असून, नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांनी केले आहे.

जनगणना-२०२७ अंतर्गत घरांना क्रमांक देणे, घरयादी तयार करणे तसेच नागरिकांची प्राथमिक माहिती संकलित केली जाणार आहे. प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी भेट देऊन माहिती घेणार असून, प्रत्येक कुटुंबाने योग्य व अचूक माहिती देणे आवश्यक आहे.

या पहिल्या टप्प्यात संकलित होणारी माहिती राष्ट्रीय विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. देशातील लोकसंख्या, घरांची स्थिती, उपलब्ध मूलभूत सुविधा, सामाजिक व आर्थिक स्थिती यासंबंधी आवश्यक आकडेवारी उपलब्ध होऊन केंद्र व राज्य शासनाला विविध योजना आखण्यास व प्रभावी अंमलबजावणी करण्यास मदत होणार आहे.

प्रगणक व पर्यवेक्षकांना घरातील सदस्यांची माहिती, घराच्या वापराची माहिती, उपलब्ध सुविधा, पाणी, स्वच्छता, वीज, निवासाची स्थिती आदी बाबींविषयी माहिती संकलित करावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता अधिकृत प्रगणकांना माहिती द्यावी.

जनगणना ही राष्ट्रीय कर्तव्याची प्रक्रिया असून, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.