spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पवारांशी असहमत असणारे संजय राऊत उद्या ‘उबाठा’च्याही विरोधात जातील

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचे कौतुक करणाऱ्या शरद पवार यांच्या मताशी मी सहमत नाही, असे वक्तव्य करणारे संजय राऊत उद्या आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्याही भूमिकेशी आपण सहमत नाही असे सांगायला कमी करणार नाहीत. राहुल गांधींची चाकरी करण्यासाठी आज शरद पवारांविरोधात भूमिका घेणारे संजय राऊत उद्या उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेत उबाठा गटाला खड्ड्यात घालण्याचे काम करतील. त्यासाठी त्यांनी काँग्रेसकडून सुपारी घेतलेली आहे, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पळ काढणारे नाहीत तर देशाचे नेतृत्व करणारे आहेत. अडीच वर्ष सत्ता मिळाल्यानंतर पळ काढून घरात बसणारे उद्धव ठाकरे हेच होते. पत्राचाळ घोटाळ्यात अटक झाल्यानंतर पळ काढणारे संजय राऊत होते. विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देतो असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी पळ काढला. संजय राऊत आणि उबाठा गटाचा पळपुटेपणा वारंवार दिसला आहे. नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आणि समर्थ असल्यानेच जनतेने तीन वेळा त्यांना पंतप्रधानपदी निवडून दिले आहे. ते सातत्याने जनतेशी संवाद साधतात. मन की बात अथवा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नाला कशी उत्तर द्यायची हे त्यांना चांगले ठाऊक आहे. संजय राऊत यांनी त्यांना शिकवण्याची गरज नाही. तुमच्या पक्षांमध्ये काय चाललेय ते बघा. ज्या पद्धतीने तुम्ही कारभार केला, घोटाळे केलेत, त्यामुळे जनतेने तुम्हाला नाकारले आहे. पंतप्रधान मोदीचा थेट जनतेशी संवाद आहे. तुमच्यासारख्या मध्यस्थाची त्यांना गरज नाही, असे बन यांनी सुनावले.

महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणे हे देवाभाऊंचे काम आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक प्रकल्प गुंडाळले. मुंबईच्या मेट्रो, रिफायनरी, अणुऊर्जा प्रकल्पासहित सर्व प्रकल्प बासनात गुंडाळण्याचे, त्यांना केराची टोपली दाखवण्याचे पाप उद्धव ठाकरेंनी केले. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक इथे झाली. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागाचा कायापालट झाला. आता रत्नागिरी – सिंधुदुर्गमध्ये रिफायनरी प्रकल्प येणार आहेत. चांगले रस्ते होत आहेत. वेगवेगळे उद्योजक तिथे गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हे भाजपाचे धोरण आहे. तुमच्यासारखे घरात बसून आम्ही काम करत नाही. तुमच्यासारखे प्रकल्प बंद करून आम्ही जनतेची फसवणूक करत नाही. तुमच्यासारखा प्रत्येक प्रकल्पाला आडकाठी घालायची, विरोध करायचा, शेतकऱ्यांची फसवणूक करायची हा भाजपा किंवा देवाभाऊंचा धंदा नाहीय. आम्ही सातत्याने जनतेच्या हिताचे आणि विकासाचे प्रश्न मार्गी लावतो. मुंबईचा मेट्रो प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प किंवा गडचिरोलीमध्ये पोलाद निर्मितीसाठीचा कारखाना असेल, या सर्वांगीण विकासासाठी देवाभाऊ कटिबद्ध आहेत आणि त्या दृष्टीने पावले टाकली जात असल्याचे बन यांनी स्पष्ट केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.