spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राज्यस्तरीय आरक्षण उपवर्गीकरण चिंतन परिषदेचे आयोजन नागपुरात 24 मे रोजी

नागपूर :- लॉर्ड बुद्धा टीव्ही, लहू सेना व राजकुमार बडोले फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने येत्या २४ मे, २०२६ रोजी, नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृह येथे राज्यस्तरीय आरक्षण उपवर्गीकरण चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आलेले असून या परिषदेत महाराष्ट्र राज्यातील विविध संघटनांचे जवळपास १००० प्रतिनिधी सहभागी होवून उपवर्गीकरणाच्या प्रश्नाबाबत सर्वकष वैचाारिक मंथन करतील, असे संजय कठाळे आणि भैय्याजी खैरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. सदर परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्यायमंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होईल. तसेच चर्चासत्र दुपारी ११.३० वाजेपासून सुरू होईल. सदर चर्चासत्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या बाजूने तसेच विरूद्ध बाजूने भूमिका घेतलेल्या विविध संघटनेचे प्रमुख, अभ्यासक व विचारवंतांना आपली भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर चर्चासत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव व आरक्षण धोरणाचे गाढे अभ्यासक डॉ.पुरणचंद्र मेश्राम यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आले आहे. सदर चर्चासत्रात सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. सुकुमार कांबळे (सांगली), महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जमाती आयोगाचे माजी सदस्य सचिव प्रा.संदेश वाघ (मुंबई), लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक डॉ.रामचंद्र भरांडे (नांदेड), सामाजिक संशोधक मुकेश दुपारे (पुणे), लहुजी ब्रिगेडचे अध्यक्ष अंकुश गोतावळे (चंद्रपूर), आंबेडकरी विचारवंत डॉ. रविंद्र मुंद्रे (अमरावती), आझाद क्रांती सेनेचे अध्यक्ष राजेश घोडे (बीड), वाल्मीकी समाजाचे नेते व विचारवंत प्रा.किशोर बिरला (नागपूर), राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते डॉ. गणेश बोरकर (अकोला), अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे अध्यक्ष जयसिंग कछवाह (नागपूर), खाटीक समाज विकास मंचचे अध्यक्ष विशाल लारोकर, माजी नगरसेवक नागेश मानकर, लहु सेनेचे अध्यक्ष संजय कठाळे (नागपूर), सिख सिकलकर समाजाचे नेते रतनसिंग बावरी (नागपूर), सामाजिक कार्यकर्ते आयु. भैय्याजी खैरकर आदी आपले विचार व्यक्त करतील. प्रस्तुत परिषदेत उपवर्गीकरणा संबंधी अनुसूचित जाती मधील विविध जाती समूहाची भूमिका, उपवर्गीकरणाचे भविष्यकालीन फायदे व तोटे, अनुसूचित जातीची एकजुटता, त्यांचे संवैधानिक संरक्षण व वैधानिक न्यायाच्या दृष्टीने उपवर्गीकरणाची हितावहता व वैधानिक वैधता आणि उपवर्गीकरणाचे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय परिणाम अशा विविध प्रश्नांवर सर्वकष मंथन, चिंतन व संवाद करण्यात येईल. सदर परिषदेचा उद्देश वादविवादाचा नसून संवादाचा आहे. त्यामुळे ह्या विचार मंथनातून आपसात संघर्ष न करता अनुसूचित जातीच्या सर्व वर्गाला न्याय मिळेल यादृष्टीने सकारात्मक मार्ग काढण्याच्या दृष्टीने सदर परिषद ही महत्वपूर्ण व ऐतिहासिक ठरणार आहे. प्रस्तुत परिषदेत हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेच्या आयोजन समितीचे सदस्य सर्वश्री सचिन मून, संजय कठाळे, प्रशांत शहारे, राकेश भास्कर, भैय्याजी खैरकर, नरेश गायकवाड, संजय मून, उत्तम शेवडे, दिनेश अंडरसहारे, रवीभाऊ शेंडे, प्रा. राहूल मून, राहूल जगताप, पपीता खोब्रागडे, प्रदिप मून (समता सैनिक दल) आणि प्रा.विनोद बागडे यांनी केले आहे.संजय कठाळे अध्यक्ष, लहू सेना, नागपूर.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.