spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘इंडियन ऑईल’च्या सीएसआर उपक्रमातून कूपर रुग्णालयास बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) च्या कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत जुहू येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर. एन. कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात पूर्णपणे स्वयंचलित अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत सांगितले आहे की, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य आहे. कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक रुग्णालयांना अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची जोड मिळत असल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होत आहे. यामुळे रुग्णांना जलद आणि अचूक सेवा देण्यास मदत होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे आधुनिकीकरण वेगाने सुरू असून, हा उपक्रम त्याच दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे रुग्णालयाच्या निदान क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. मोठ्याप्रमाणात रक्त तपासण्या अधिक वेगाने आणि अचूकपणे करता येणार आहेत. नियमित तसेच तातडीच्या बायोकेमिकल चाचण्या कमी वेळेत पूर्ण होणार असल्याने डॉक्टरांना त्वरित वैद्यकीय निर्णय घेणे अधिक सुलभ होणार आहे. परिणामी, रुग्णांना उपचार लवकर सुरू करण्यास मदत मिळणार असून आरोग्यसेवेची गुणवत्ता उंचावणार आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील हजारो रुग्णांसाठी डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय हे महत्त्वाचे सार्वजनिक आरोग्य केंद्र मानले जाते. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर या रुग्णालयावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझरची उपलब्धता ही सार्वजनिक आरोग्यसेवेला मोठा आधार ठरणार आहे.

या उपक्रमामुळे प्रयोगशाळेतील कार्यपद्धती अधिक कार्यक्षम होणार असून अहवालांचा ‘टर्नअराउंड टाइम’ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नमुन्यांचे विश्लेषण अधिक अचूकपणे करता येणार असल्याने उपचार प्रक्रियेलाही गती मिळणार आहे.

इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात सातत्याने करण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे सार्वजनिक आरोग्य संस्थांची क्षमता वाढत असून, नागरिकांना अधिक सक्षम व विश्वासार्ह वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.