बस ऑपरेटरचे प्रलंबित देयकाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अकिंत यांनी घेतला परिवहन विभागाचा आढावा 

0
39

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाशी संबंधित विविध विषयांबाबत अतिरिक्त आयुक्त अंकित यांनी शुक्रवारी (ता. 29) मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभा कक्षात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी बस ऑपरेटरच्या प्रलंबित देयकांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीला उपायुक्त तथा प्रभारी परिवहन व्यवस्थापक  राजेश भगत, परिवहन प्रशासकीय अधिकारी योगेश लुंगे, कार्यकारी अभियंता नरेश शिंगणजुडे, राजेंद्र राठोड यांच्यासह प्रशासनिक व्यवस्थापक गजानन नागूलवार, लेखा अधिकारी चाऊलवार, चलो मोबीलिटी चे विशाल कनोजिया, सचिन गाडबईल, अभिजित देवतळे, हेमंत चौधरी, अमोल ठाकरे तसेच ‘चलो मोबिलिटी प्रा. लि.’ व इतर ऑपरेटर प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत अतिरिक्त आयुक्त अंकित यांनी मनपाच्या सर्व बस डेपोंमधील बांधकाम, इलेक्ट्रिक वर्क व इतर प्रश्नांचा आढावा घेतला. याचवेळी मनपातर्फे संचालित सर्व डिझेल व इलेक्ट्रिक बसेस, त्यांचे थांबे, तसेच पटवर्धन येथील डेपोची पूर्ण माहिती, तेथील बसेसची क्षमता आणि स्क्रॅप बसेसची माहिती घेत सर्व माहिती पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश दिले. शिवाय बस डेपोमधून कमी बस संचालित होत आहे, तेथील मनुष्यबळाचा वापर जास्त बसेस असलेल्या इतर डेपोंमध्ये परावर्तीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शिवाय बस डेपोमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या एकांदरीत मंजूर पदांची पूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. डेपोमधील प्रलंबित व अत्यावश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच त्यांनी बस ऑपरेटर्सच्या प्रलंबित देयकांबाबत (बिलांबाबत) तातडीने कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले. याशिवाय, एनएमआरडीए हद्दीत ७ मार्गांवर मनपाची बस सेवा चालविण्याकरिता एक ‘फायनान्शियल अनालिसिस’ तयार करण्याच्या सूचना केल्या. परिवहन विभागाशी संबंधित विविध अडचणी, डेपो, बस ऑपरेटर, प्रलेविअ , राज्य सरकार, महावितरण, एमएसआरटीसी यांच्याशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्न, त्यांचे करण्यात येणारे निराकरण, विकासकामे आणि भविष्यातील नवीन उपाययोजनांबाबत लवकरात लवकर माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी परिवहन विभागाला दिले.