करोडोंचा खर्च, तरीही बेला दवडीपार जलमय; खासदार डॉ. प्रशांत पडोळे आक्रमक, अधिकाऱ्यांची कानउघाडणी

0
34

– ४ वर्षांपासून घरांत शिरतेय कमरेपर्यंत पाणी; निकृष्ट कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात

हंसराज,भंडारा बेला :- भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील बेला दवडीपार येथील पुलाच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि निकृष्ट कामामुळे गेल्या चार वर्षांपासून येथील नागरिक नरकयातना भोगत आहेत. पावसाळ्यात नागरिकांच्या घरात कमरेच्या वर पाणी शिरत असून, या गंभीर समस्येची दखल घेत खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली. यावेळी त्यांनी कामातील हलगर्जीपणाबद्दल गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना फोनवर चांगलेच खडे बोल सुनावले आणि तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

बेला येथील दवडीपार रोडवरील नाल्यावर गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पूल बांधण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार येथे पिलरवर (कॉलम) आधारित ओव्हरब्रिज बांधणे अपेक्षित होते. मात्र, विभागाने केवळ ९ लहान पायली (पाईप) टाकून त्यावर स्लॅब टाकला आहे. यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी ‘रिव्हर्स’ मारून थेट आंबेडकर वॉर्ड, समतानगर बेला या गावात शिरते. चार वर्षांपासून पावसाळ्यात नागरिकांच्या घरात कमरेपर्यंत पाणी साचते. यामुळे लोकांचे संसार उध्वस्त होत असून घरात साप, विंचू व इतर सरपटणारे प्राणी येत असल्याने जीवितहानीची भीती निर्माण झाली आहे.

दीड कोटी खर्च तरीही ‘जैसे थे’ स्थिती या पुलाचे काम जवळपास १.५ कोटी रुपये खर्चून करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत हा पूल इतक्या मोठ्या खर्चाचा वाटत नसल्याचा संशय खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केला. “कामाच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचार आणि निकृष्ट नियोजन सुरू आहे. जनतेच्या जीवाशी हा खेळ किती दिवस चालणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

प्रशासनाला निवेदने, तरीही दुर्लक्ष गावकऱ्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समिती, आमदार, खासदार आणि पाटबंधारे विभागाला निवेदने दिली आहेत. मात्र, तरीही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत. आता पावसाळा उंबरठ्यावर असल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

खासदार डॉ. पडोळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या प्रश्नी पाठपुरावा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची व वैनगंगा नदीत पाण्याचा निचरा होईल अशी सोय करण्याची विनंती करणार असल्याचे यावेळी सांगितले. पाहणी दरम्यान सरपंच शारदाताई गायधने, सुभाष नागदेवे, संदीप रोडगे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

   “आम्ही अनेकदा गोसेखुर्द विभागाला ही अडचण समजावून सांगितली, मात्र अधिकारी मनमर्जीने वागतात. चुकीच्या सिस्टिमने काम केल्यामुळे शेतकऱ्यांनाही रस्ता मिळत नाही आणि नागरिकांचेही नुकसान होत आहे.

यावर्षी जर पुन्हा नागरिकांना त्रास झाला, तर गावकरी पुलाचे बांधकाम तोडून टाकतील,” असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

– सरपंच शारदा गायधने बेला