कामठी :- राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांची जोरदार चर्चा सुरू आहे. भेसळखोर आणि अवैध व्यवसायांवर थेट धाडी टाकून कठोर कारवाई करण्याचा सपाटा त्यांनी लावला असून, राज्यभरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. मात्र, एकीकडे आयुक्त मुंढे कारवाईचा बडगा उगारताना दिसत असताना, दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुका येथे त्यांच्या मोहिमेलाच स्थानिक अधिकारी हरताळ फासत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आयुक्त मुंढे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहक्षेत्रातील नागपूर शहरातही निर्भीडपणे कारवाई केली. मात्र नागपूरचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि तालुक्याचा दर्जा प्राप्त असलेल्या कामठी शहरात अवैध गुटखा, सुगंधित तंबाखू, सुपारी तसेच खर्रा विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याचे दिसून येते. शहरातील अनेक पानटपऱ्यांवर खुलेआम सुगंधित तंबाखू व खर्रा विकला जात असल्याची सर्वत्र चर्चा आहे. असे असतानाही स्थानिक अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी या प्रकारांकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
मागील महिन्यात पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या निर्देशानुसार पोलीस विभागाने कामठी शहरातील काही ठिकाणी धाडी टाकून सुगंधित तंबाखू व खर्रा तयार करणारी यंत्रे जप्त केली होती. तसेच चार आरोपींना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर सिगारेटच्या अवैध व्यवसायावरही धाड टाकण्यात आली होती. या कारवायांमुळे अवैध तंबाखू व खर्रा विक्रेत्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, काही दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाल्याचे दिसून येत आहे. शहर तसेच ग्रामीण भागात सुगंधित तंबाखू, खर्रा आणि सिगारेटचा अवैध व्यवसाय पुन्हा बिनधास्त सुरू असल्याचे चित्र आहे. स्थानिक अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी केवळ नोंदी पूर्ण करण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांवर कारवाईचा दिखावा करतात, मात्र मोठ्या पुरवठादारांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे. “चोर सोडून संन्याशाला फाशी” अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असून, मोठ्या माशांना अभय आणि लहान विक्रेत्यांना कारवाईचा फटका बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कामठी शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू व्यवसायामागील मुख्य सूत्रधारांपर्यंत संबंधित यंत्रणा का पोहोचत नाही? की पोहोचू इच्छित नाही? हा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे. स्थानिक अधिकारी आयुक्त मुंढे यांच्या मोहिमेला अशीच हरताळ फासत राहणार का, अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे.
त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतः कामठी परिसरातील परिस्थितीकडे विशेष लक्ष देऊन अवैध व्यवसायांना पाठीशी घालणाऱ्या किंवा त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कामठी तालुक्यातील सुजाण नागरिकांकडून करण्यात येत आहे.
– संदीप कांबळे







