spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हवामानावर आधारित संत्रा फळपीक विम्याचे ट्रिगर तात्काळ जाहीर करा ! 

– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निवेदन ! 

– ४५ दिवसात विमा परतावा न मिळण्यास दिला तीव्र आंदोलनाचा इशारा ! 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2025-26 अंतर्गत हवामानावर आधारित आंबिया बहार संत्रा फळपीक विमा काढला असताना अद्याप फळपीक विम्याचे ट्रिगर जाहीर करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंबिया बहार संत्रा फळपीक विम्याचे ट्रिगर तात्काळ जाहीर करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 45 दिवसांच्या आत विमा रक्कम जमा करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांच्या नेतृत्वात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांना निवेदन देऊन करण्यात आली.

यावर्षी अवकाळी पाऊस, गारपीट, वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा आणि बदलत्या हवामानामुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात घट झाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत विमा मदतीची रक्कम हा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार असताना ट्रिगर जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे.

रुपेश वाळके यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, “विमा हप्ता वेळेवर भरायचा आणि नुकसान झाल्यावर मदतीसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करायची, ही भूमिका शेतकऱ्यांना मान्य नाही. शासन व विमा कंपनीने तात्काळ ट्रिगर जाहीर करून विमा रक्कम वितरित करावी.”

गारपीटग्रस्त पात्र शेतकऱ्यांच्या विमा मंजुरीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच विमा वितरण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून सर्व पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली.

फळ पिक विमा वितरण प्रक्रियेत होणारा विलंब थांबवून पारदर्शकता राखावी “ट्रिगर जाहीर करण्यात व विमा रक्कम वितरित करण्यात आणखी विलंब झाल्यास संत्रा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरतील. मोर्चे, धरणे व तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.

अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी काढलेल्या हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा हवामानावर आधारित आंबिया बहार संत्रा फळपीक विमा (2025-26) चा कालावधी ३१ मे रोजी संपला तरीही अद्याप ट्रिगर जाहीर झाले नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना ट्रिगर मध्ये फेरबदल होणार असल्याचा संशय व्यक्त होत असल्यामुळे यामध्ये पारदर्शकता यावी म्हणून विलंब न करता तत्काळ ट्रिगर जाहीर करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना 45 दिवसांच्या आत विमा रक्कम खात्यात जमा करावी अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते साहेब यांच्यासोबत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस हितेश साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ सेल अध्यक्ष दिलीप भुतकर, गोपाल चारे, आकाश साबळे, कांचन कुकडे, मनीष गुडधे, यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होते.

“शेतकऱ्यांकडून विमा हप्ता वेळेवर वसूल केला जातो, मग नुकसान भरपाई देताना दिरंगाई का? ट्रिगर जाहीर करण्यात होत असलेला विलंब शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. आता संत्रा उत्पादकांचा अंत पाहू नका. तात्काळ ट्रिगर जाहीर करून विमा रक्कम द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडल्याशिवाय पर्याय उरणार नाही.”

– रुपेश वाळके अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.