spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लग्नाला अवघे दोन तास शिल्लक, मंडपात पोहोचले सरकारी पाहुणे; कामठीतील १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला

कामठी :- बालविवाह प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. लग्नसोहळा सुरू होण्यास अवघे दोन तास शिल्लक असताना कामठी परिसरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करून रोखला.

जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कामठी येथे १५ वर्षीय मुलीचा विवाह १९ वर्षीय युवकासोबत होणार होता. माहितीची खातरजमा होताच जिल्हा बाल संरक्षण पथक आणि नवीन कामठी पोलीस स्टेशनचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व संयुक्त कारवाई केली.

पडताळणीदरम्यान मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले. बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ अंतर्गत असलेल्या तरतुदी आणि कायदेशीर परिणामांची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशासनाच्या तत्परतेमुळे नियोजित बालविवाह थांबविण्यात यश आले.

यावेळी पालक व नातेवाईकांना मुलीच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित भविष्यासाठी बालविवाह टाळण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच अल्पवयीन मुलांचे विवाह करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याची जाणीव करून देण्यात आली.

ही कारवाई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, पोलीस उपनिरीक्षक श्रुती कदम, चाइल्ड हेल्पलाइन प्रतिनिधी अनिकेत भिवगडे, मीनाक्षी धडाडे, सचिन धोतरकर, तसेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या वैशाली पाटील आणि नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या पथकाचा सहभाग होता.

या यशस्वी कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीचे बालविवाहापासून संरक्षण करण्यात आले. नागरिकांनी अशा प्रकारच्या घटना आढळल्यास तात्काळ चाइल्ड हेल्पलाइन १०९८ किंवा संबंधित प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.