spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सोयाबीन पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करा खोडमाशी व्यवस्थापनासाठी पंकृविचा सल्ला

नागपूर :- सोयाबीनच्या रोपावस्थेत खोडमाशीचा प्रादुर्भाव होत असल्याने या रोगाच्या व्यवस्थापनासाठी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करण्याचे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केले आहे.

विद्यापीठातील कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी.बी. उंदीरवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोडमाशी प्रादुर्भावामुळे दुबार पेरणीची शक्यता असते. मात्र आधीच बीज प्रक्रिया केल्यास रोप किडीस बळी पडण्याचे प्रमाण कमी असते. खोड माशी लहान, चमकदार, काळ्या रंगाची व लांबी 2 मि.मी. असते. अंड्यातून निघालेली अळी फिक्कट पिवळ्या रंगाची व 2 ते 4 मि.मी. लांब असते. ही अळी जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. त्यानंतर पानाच्या देठातून खोडात किंवा आतील भागात प्रवेश करून पोखरत जाते. हा प्रादुर्भाव सुरुवातीला झाला तर झाड वाळते. मोठ्या रोपांवर असा परिणाम दिसत नाही. या रोपांवर माशीला बाहेर येण्यासाठी केलेल छिद्र आढळते. अशा कीडग्रस्त रोपांवरील फुले गळतात तसेच शेंगातील दाण्यांचे वजन कमी होऊन उत्पादनात 16 ते 30 टक्के घट होते. त्यामुळे पेरणी करण्यापूर्वी रासायनिक कीटकनाशक थायोमेथोक्झाम 30 टक्के एफएस 10 मिलि – 1 कि. बियाणे बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. त्यामुळे सुरुवातीचे 25 ते 30 दिवस सोयाबीन पीक खोडमाशीच्या प्रादुर्भावापासून दूर राहते.

बीज प्रक्रिया करताना सुरुवातीला रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यानंतर कीटकनाशक व शेवटी जैविक बुरशीनाशक व जैविक संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. उगवणीनंतर आठ ते दहा दिवसांनी पिवळे चिकट सापळे लावून खोडमाशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे.

कोणत्याही कारणाने थायोमेथोक्झामची प्रक्रिया होऊ शकली नाही तर सोयाबीनचे पीक 15 दिवसांचे झाल्यानंतर इथियॉन 15 टक्के 30 मिलि किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के 7.5 मिलि किंवा क्लोरँट्रनिप्रोल 18.5 टक्के 30 मिलि यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, अशाही सूचना डॉ. उंदीरवाडे यांनी केल्या आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.