– व्हिजेएनटी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीची संधी
नागपूर :- स्पर्धात्मक युगात गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळावे आणि आर्थिक मर्यादांमुळे कोणत्याही विद्यार्थ्याची स्वप्ने अपूर्ण राहू नयेत, या उद्देशाने वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) मार्फत २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी विविध स्पर्धा परीक्षांच्या मोफत ऑनलाईन प्रशिक्षण उपक्रमासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा लाभ राज्यातील विमुक्त जाती (व्हीजे-ए) तसेच भटक्या जमाती ब, क व ड (एनटी-बी, एनटी-सी व एनटी-डी) नॉन-क्रिमीलेअर प्रवर्गातील पदवीधर विद्यार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक मा. प्रशांत वावगे यांनी दिली.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ग्रुप बी व सी, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (एमईएस), आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ), रेल्वे भरती परीक्षा (आरआरई), एमबीए (सीईटी-कॅट), पोलिस-मिलिटरी भरती, कर्मचारी निवड आयोग (एसएससी-सीजीएल) तसेच टीएआयटी परीक्षांसाठी मोफत पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी प्रवेशपूर्व चाचणी परीक्षेकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया ८ जूनपासून सुरू झाली असून २५ जून २०२६ ही अर्जाची अंतिम मुदत आहे. ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ प्रशिक्षणच नव्हे तर प्रत्येक महिन्याला निवास व भोजन व्यवस्थेसाठी विद्यावेतन तसेच प्रशिक्षणासाठी रुजू होताना एकरकमी आकस्मिक निधीदेखील देण्यात येणार आहे. नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत हे प्रशिक्षण दिले जाणार असून विद्यार्थ्यांची निवड चाळणी परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल. प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून अंतिम निवड करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असून राज्यभरातून अर्जांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रशिक्षणासंदर्भातील सर्व निकष, अटी, शर्ती आणि अर्ज प्रक्रियेची माहिती www.vanarti.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच vanarti.info@gmail.com या ई-मेलद्वारेही माहिती मिळू शकते. विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया शेवटच्या दिवसापर्यंत न थांबवता वेळेत पूर्ण करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. या उपक्रमामुळे अनेक होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ मिळणार असल्याचा विश्वास मा. प्रशांत वावगे यांनी व्यक्त केला आहे.
अर्ज भरताना कागदपत्रांची पूर्तता आवश्यक
स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करताना विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे स्पष्ट, स्वाक्षांकित आणि स्कॅन करून अपलोड करावीत, असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले. अर्जासोबत आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, वैध नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, १२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, पदवी उत्तीर्ण गुणपत्रक अथवा प्रमाणपत्र, पदव्युत्तर शिक्षणाशी संबंधित कागदपत्रे तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्वाचा सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला अपलोड करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच अर्ज स्वीकृत केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी www.vanarti.in या संकेतस्थळावरील सूचना फलकामधील संबंधित परीक्षेची माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी ७८८७८८२०२६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही अतुल सावे यांनी केले आहे.







