– मनपाच्या स्वच्छता अभियानांतर्गत आमराई परिसराची विशेष स्वच्छता
– गेल्या ८ दिवसांत १,२५४ किलो कचरा संकलित
नागपूर :- महापौर निता ठाकरे, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात शहरात राबविण्यात येणाऱ्या विशेष स्वच्छता अभियानांतर्गत संपूर्ण शहरात स्वच्छतेच्या महापार्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छता व पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यात काही स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने सोनेगाव येथील ‘आमराई’ परिसरात स्वच्छता मोहीम मोठ्या जोमाने सुरू आहे. या उपक्रमात वृक्षित फाउंडेशनचे ३२ स्वयंसेवकांनी अतिशय परिश्रमपूर्वक सहभाग घेत आमराई परिसराचा कायापालट करण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या आठ दिवसात १ हजार २५४ किलो कचरा संकलित केला करण्यात आला आहे. येत्या रविवार १४ जून सकाळी ७ वाजता पासून मोठी स्वच्छता मोहीम आमराई येथे घेण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
नागपूर महानगरपालिकेद्वारे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत ५ जून ते १२ जून या कालावधीत राबविण्यात आलेल्या या विशेष स्वच्छता मोहिमेत एकूण १ हजार २५४ किलो अर्थात १.२५ टन पेक्षा जास्त कचरा गोळा करण्यात यश आले आहे. वृक्षित फाउंडेशनतर्फे दररोज येथे स्वच्छता केली जात असून, आतापर्यंत दैनंदिन कचरा संकलनानुसार ५ व ६ जून रोजी २८० किलो, ७ जून रोजी ३३५ किलो, ८ जून रोजी १०४ किलो, ९ जून रोजी ९६ किलो, १० जून रोजी ९३ किलो, ११ जून ९० किलो, १२ जून रोजी २५६ किलो, असे एकूण १,२५४ किलो कचरा संकलित करण्यात आला आहे. आमराई परिसराची ही स्वच्छता मोहीम पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून परिसराचे सौंदर्य अबाधित राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कार्यात वूक्षित संस्थेच्या ३२ स्वयंसेवकांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. तरी, शहरातील सर्व नागरिकांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आमराई परिसरासह संपूर्ण शहर स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी आपल्या सहभागाची नोंद करावी. आपल्या योगदानानेच आपण एक स्वच्छ आणि सुंदर नागपूर घडवू शकतो, असे आवाहन मनपाद्वारे केले आहे.







