spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शून्य ते 5 वर्षे वयोगटातील 11 हजार 253 बालकांना मिळणार पोलिओ लस

कामठी :- राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत येत्या 28 जून रोजी कामठी शहरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने कामठी पंचायत समिती सभागृहात शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. निशात शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली.

बैठकीत पल्स पोलिओ मोहिमेचे नियोजन, अंमलबजावणी तसेच विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सुरेंद्र गिऱ्हे आणि नितीन सावते यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या मोहिमेदरम्यान शासकीय रुग्णालये, घराजवळील बूथ, बसस्थानके, रेल्वे स्थानके, मोबाईल व्हॅन आणि इतर निश्चित केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षिका डॉ. निशात शेख यांनी केले.

कामठी तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे लसीकरण करण्यासाठी विशेष लसीकरण केंद्रे कार्यरत राहणार आहेत. यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी, परिचारिका, अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविकांची मदत घेण्यात येणार असून, मोहिमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यवेक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने नागरी आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. 28 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच 28 जून ते 2 जुलै या कालावधीत आयपीपीआय (IPPI) अंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन बालकांना पोलिओचे डोस देणार आहेत.

Popular Articles