spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जागतिक वृद्ध छळ-प्रतिबंधक जागृती दिनानिमित्त राष्ट्रीय अहवालाचे प्रकाशन

नागपूर :- जागतिक वृद्ध छळ-प्रतिबंधक जागृती दिन २०२६ निमित्त हेल्पएज इंडियातर्फे मणीबेन एम.पी. शाह महिला महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या एव्ही रूममध्ये आयोजित या कार्यक्रमात “हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम वृद्धत्व : काळजी, प्रतिष्ठा आणि स्वावलंबन सुनिश्चित करणे” या विषयावरील राष्ट्रीय अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रार्थना गीताने झाली. हेल्पएज इंडियाचे सह-संचालक राम नाईक यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी प्रकाशित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अहवालात उष्णतेच्या लाटा, पूर, दुष्काळ आणि इतर पर्यावरणीय बदलांमुळे ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेण्यात आला असून, हवामान- संबंधित आपत्तींपासून वृद्धांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. हेल्पएज इंडियाचे महाराष्ट्र व गोवा विभागाचे कार्यक्रम सह-संचालक व्हॅलेरियन पेस यांनी पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे अहवालाची माहिती दिली. त्यांनी अहवालात समाविष्ट राज्ये, जिल्हे, प्रतिसादकर्त्यांची संख्या तसेच आपत्ती जोखीम कमी करण्याच्या योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्याच्या गरजेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ‘सिल्व्हर इनिंग्ज’ संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष शैलेश मिश्रा होते. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखणारा आणि त्यांना आधार देणारा ‘वृद्ध-स्नेही समाज’ निर्माण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच ज्येष्ठांच्या प्रतिष्ठा, सुरक्षितता आणि स्वावलंबनासाठी कुटुंब, समाज आणि विविध संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. सायगीता चित्तुरू, डॉ.अर्चना पाटकी, डॉ. नागनाथ नरसिंहन प्रेम आणि डॉ. भालचंद्र पेढंबकर यांच्या सहभागाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेत हवामान बदल आणि वृद्धत्व, स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया), वृद्धांच्या आरोग्यविषयक समस्या, वृद्धांवरील छळ रोखण्याचे उपाय तसेच भावनिक व सामाजिक आधाराची गरज यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रश्नोत्तर सत्रात उपस्थितांनी वक्त्यांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. डॉ.रेखा शेलार यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे संचालन व समन्वय राम नाईक यांनी केले. या कार्यक्रमाद्वारे ज्येष्ठ नागरिकांची काळजी, त्यांचे संरक्षण आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सामावून घेण्याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. तसेच हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करताना ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित, सन्माननीय आणि स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी समाजाच्या सामूहिक जबाबदारीवर भर देण्यात आला. असे प्रसिद्धी पत्रकात हेमंत दानवे यांनी माहिती दिली.

Popular Articles