कामठी :- मित्रांमधील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका मजुरावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जे.पी. नगर येथे घडली. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून लोखंडी पत्र्याचा चाकू जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सूर्यप्रकाश गोरे (वय 43, रा. बापूचा बगीचा, अजनी रोड, कामठी) हे दि. 16 जून रोजी रात्री सुमारे 11 वाजता त्यांच्या एका मित्रासह आरोपी तरुण अशोक मेश्राम (वय 26, रा. जे.पी. नगर, कामठी) याच्या घरी गेले होते.
यावेळी आरोपीने फिर्यादीच्या मित्राला, “मी कामावर असताना तू माझ्या घरी का येतो?” असा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद शांत करण्यासाठी मनोज गोरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या आरोपीने त्यांना धक्का देऊन खाली पाडले आणि स्वतःजवळील चाकूने वार करून जखमी केले.
या घटनेप्रकरणी मनोज गोरे यांच्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलीस ठाण्यात अप. क्र. 363/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 109, 115(2), 351(3) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुनी कामठी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी तरुण अशोक मेश्राम याला दि. 17 जून रोजी सकाळी 6.31 वाजता अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.







