शहरातील झोपडपट्टी परिसरात मनपाची स्वच्छता

0
28

– पर्यावरण संवर्धन पंधरवडा निमित्त मनपाचे विशेष अभियान

नागपूर :- शहराला स्वच्छ, सुंदर, स्वस्थ आणि हरित स्वरूप देण्याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘विशेष स्वच्छता अभियानांतर्गत मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे गुरुवारी (ता.१८) शहरातील विविध ४० झोपडपट्टी परिसरात स्वच्छता अभियान व पर्यावरण जनजागृती करण्यात आली. मोहिमेदरम्यान परिसरातील साचलेला कचरा, प्लास्टिक, पालापाचोळा तसेच इतर घनकचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

नागपूर महानगरपालिकेच्यावतीने संपूर्ण शहरात ‘विशेष स्वच्छता अभियान’ राबविण्यात येत असून, या अभियानाअंतर्गत महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, अतिरिक्त आयुक्त अंकित यांच्या निर्देशानुसार नागपूर शहरातील विविध झोपडपट्टी वस्त्यांमधील परिसराची साफसफाई करण्यात आली. या सफाई अभियानात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सफाई कर्मचारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.

धरमपेठ झोन मधील काचीपुरा झोपडपट्टी वस्तीमध्ये मनपाद्वारे विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, मनपाचे स्वच्छता ब्रँड अँबेसिडर व ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, शीतल चौधरी, श्रिया जोगे, प्रिया यादव, सर्वश्री मेहुल कोसुरकर, विष्णूदेव यादव, पिनाकी बानिक, प्रतीक इसमपेल्लीवार, तुषार देशमुख यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संपूर्ण परिसर सफाई करीत स्वच्छ केला.

याशिवाय हनुमान नगर झोनमधील नेहरूनगर झोपडपट्टी परिसर येथे सफाई अभियान राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. यावेळी मोहिमेदरम्यान परिसरातील साचलेला कचरा, प्लास्टिक, पालापाचोळा तसेच इतर घनकचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, सार्वजनिक जागा व नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत झोनल अधिकारी दिनेश कलोडे, स्वच्छता निरीक्षक रवींद्र शेट्टी यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

याशिवाय गांधी-महाल झोनमधील प्रभाग 18, सिरसपेठ मठ्ठीपुरा झोपडपट्टी वस्ती, आशीनगर झोनमधील माया नगर, नेहरूनगर येथील प्रभाग 26, वाठोडा जुनी वस्ती, धंतोली झोनममधील प्रभाग 17, अशोक बुद्ध विहार, प्रभाग 33 आंबेडकर नगर, धरमपेठ झोनमधील कुंभार टोली, गांधी-महाल झोनमधील ढिवर पुरा, सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग 20 बारसेनगर, नेहरुनगर झोनमधील दिघोरी जुनी वस्ती येथे मोहिमेदरम्यान सफाई अभियान राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ केला.