spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जप्त केलेला ट्रॅक्टर तात्काळ सोडा, अन्यथा ४ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार ‘आक्रोश मोर्चा’

– बिगर सातबारा शेतकरी संघटनेचा प्रशासनाला थेट इशारा; वनविभागाच्या कारवाईमुळे दोन कुटुंबे संकटात

हंसराज,भंडारा तुमसर :- तुमसर तालुक्यातील मोहगाव येथील एका शेतातून वनविभागाने जप्त केलेला ट्रॅक्टर तात्काळ सोडण्यात यावा, अन्यथा येत्या ४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या कारवाईमुळे एका गरीब शेतकऱ्याची पेरणी खोळंबली असून ट्रॅक्टर मालकावर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

मौजा मोहगाव (ता. तुमसर) येथील गट क्र. ४७४/२ मधील २ हेक्टर जमिनीवर स्थानिक शेतकरी शिवदास सोमा शेंद्रे यांचा वर्षानुवर्षांपासून ताबा असून ते तिथे शेती करतात. चालू खरीप हंगामाची पूर्वतयारी  करण्यासाठी त्यांनी दशरथ धनराज इखार यांचा ट्रॅक्टर (क्र. MH-36-Z-6683) भाड्याने बोलावला होता. मात्र, वनपरिक्षेत्र कार्यालय तुमसर यांनी सदर जमिनीच्या वादातून हा ट्रॅक्टर शेतातून जप्त केला.

दोन निष्पाप कुटुंबांवर उपासमारीची टांगती तलवार या कारवाईमुळे ट्रॅक्टर मालक दशरथ इखार यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ट्रॅक्टर चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या इखार यांचा वनविभागाच्या जमिनीच्या वादाशी कोणताही थेट संबंध नाही, ते केवळ रोजंदारीवर काम करत होते. दुसरीकडे, मशागत थांबल्यामुळे शेतकरी शिवदास शेंद्रे यांची पेरणी धोक्यात आली आहे. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे दोन कष्टकरी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

संघटनेचा आक्रमक पवित्रा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाम यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, जर प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढून जप्त केलेला ट्रॅक्टर सोडला नाही, तर ४ जुलै रोजी भंडारा जिल्ह्यात शेतकरी महिला व पुरुषांचा मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पूर्णतः वन विभाग आणि जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

या मागणीसाठी संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर तालुका अध्यक्ष काशिराम ठाकरे, सचिव राजेश बावणे व अन्यायग्रस्त शेतकरी पाठपुरावा करत आहेत. आता जिल्हाधिकारी यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Popular Articles