spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मंत्री उदय सामंत

मुंबई :-  नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी आवश्यक विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

नाशिक कुंभमेळ्यासाठी विविध विकासकामांना सविस्तर प्रकल्प अहवालअभावी प्रशासकीय मंजुरी दिल्याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी सदस्य पंकज भुजबळ यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत एकूण ३४ हजार ७३२.३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे.

कुंभमेळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला आवश्यकतेनुसार कामांमध्ये बदल करणे तसेच नवीन कामांचा समावेश करण्याचे अधिकार देण्यात आले असल्याने या कामांसाठी स्वतंत्र डीपीआरची आवश्यकता नसल्याचेही मंत्री सामंत यांनी यावेळी नमूद केले.

रस्ते रुंदीकरण व नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचे नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352.57 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659.47 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ऑक्टोबरपासून कुंभमेळ्याच्या प्रारंभिक कार्यक्रमांना सुरुवात होणार असल्याने विकासकामे एकाचवेळी सुरू आहेत. मात्र, वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या जातील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. तसेच, सदस्य सत्यजित तांबे यांनी सुचविल्याप्रमाणे लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याबाबत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही मंत्री सामंत यांनी नमूद केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.