खापा, वार्ताहर :- उन्हाळी सुट्टीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नगर परिषदद्वारा संचालित जिजामाता प्राथमिक शाळा, खापा येथे “शाळा प्रवेशोत्सव” उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक मुकेश वाहने यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शिरा वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शासनाकडून प्राप्त झालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचेही विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कपडे, जोडे, मोजे वितरण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ शिक्षिका कल्पना कुसरामे, प्रगती साखरे, स्वप्ना कांबळे आणि योगेश भोकण यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष पियुष बुरडे, उपाध्यक्ष सुनिल पाहुणे, शिक्षण सभापती अंजली आनंद मेनकुदळे, मुख्याधिकारी सचिन राऊत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. पालकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाली. संचालन शिक्षिका स्वप्ना कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक योगेश भोकण यांनी केले.








