– पहिली ते पदवीपर्यंत मोफत व एकसमान शिक्षणाची मागणी
– अधिवेशनात शिक्षणावर ठोस चर्चा न झाल्याबाबत तीव्र नाराजी – मुंदाफळे
नागपूर :- सामाजिक कार्यकर्ते प्रेम (हितेश) मुंदाफळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शिक्षणमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, महसूलमंत्री व नागपूर- अमरावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच विधान परिषद सदस्य आमदार कृपाल तुमाने यांना पहिली ते पदवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत व एकसमान शिक्षण देण्यासाठी निवेदन सादर केले आहे. मुंदाफळे यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील लाखो गरीब, शेतकरी, कष्टकरी, मजूर व मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. शासकीय व खाजगी शाळा- महाविद्यालयात शिक्षणातील तफावत दूर करून सर्व विद्यार्थ्यांना समान दर्जाचे व मोफत शिक्षण मिळणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. त्यांनी असा आरोप केला की, संबंधित सर्व मान्यवरांना निवेदन दिले परंतु या मागणीवर कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच मुंबईतील अधिवेशनात शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर अपेक्षित गांभीर्याने चर्चा झालीच नाही. विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षणातील समानता आणि वाढत्या शिक्षण शुल्काबाबतीत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. “महाराष्ट्र सरकारने पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण पूर्णपणे मोफत व एकसमान करावे. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. सरकारने राजकीय विषयांपेक्षा विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे यावर लक्ष द्यावे.”
राज्य सरकारने तात्काळ पुढील निर्णय घ्यावेत:
-पहिली ते पदवीपर्यंत खाजगी शाळा कॉलेज व शासकीय शाळा कॉलेज शिक्षण पूर्णपणे मोफत करावे.
-शासकीय व खाजगी शाळा-महाविद्यालयांमध्ये एकसमान शिक्षण व्यवस्था लागू करावी.
-गरीब व गरजू विद्यार्थ्यांवरील शिक्षणाचा आर्थिक भार कमी करावा.
-शिक्षणाच्या प्रश्नावर विधानमंडळात सविस्तर चर्चा करून तातडीने निर्णय घ्यावा.
या मागण्यांवर शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा प्रेम (हितेश) मुंदाफळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.








