spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपा तयार करणार मध्य भारतातील पहिली वैद्यकीय ई-लायब्ररी

– डॉ. हेडगेवार ई’-लायब्ररी उभारण्याची अर्थसंकल्पात घोषणा

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, यासाठी दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अत्रे ले-आऊट येथे अत्याधुनिक ‘डॉ. हेडगेवार ई-लायब्ररी’ उभारण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय साहित्याची सर्वसमावेशक ज्ञानसंपदा उपलब्ध करून दिली जाईल. ही लायब्ररी मध्य भारतातील एकमेव आणि समर्पित वैद्यकीय ‘ई-लायब्ररी’ असेल. अशी घोषणा स्थायी समिती सभापती  शिवानी दाणी वखरे यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली.

महापौर निता ठाकरे यांच्या नेतृत्वात व उपमहापौर  लिला हाथीबेड, सत्तापक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या मार्गदर्शनात स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अत्रे ले-आऊट येथील सध्याच्या डॉ. हेडगेवार लायब्ररीचे नूतनीकरण करून तिचे वैद्यकीय ई-लायब्ररीमध्ये रूपांतर केले जाईल अशी घोषणा केली.

डॉ. हेडगेवार हे स्वतः वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉक्टर होते आणि त्यांनी समाजसेवेच्या भावनेतून आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या या कार्याला अभिवादन म्हणून मनपातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

शहरातील विद्यार्थी आणि अभ्यासक यांना वैद्यकीय साहित्याची कमतरता भासू नये, हा या ई-लायब्ररीचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी यांसारख्या विविध वैद्यकीय उपचार पद्धतींच्या साहित्यसंपदेचा समावेश असेल. विद्यार्थ्यांपासून ते वैद्यकीय क्षेत्रातील, तसेच इतर वाचकांसाठी ही ई-लायब्ररी ज्ञानाचे एक समृद्ध व्यासपीठ ठरेल. ही लायब्ररी अत्याधुनिक तर असेलच, शिवाय यामध्ये दिव्यांगांसाठी विशेष सुविधा आणि ‘ब्रेल’ साहित्यही उपलब्ध करून दिले जाईल.

झिंगाबाई टाकळी येथेही ई-लायब्ररी

झिंगाबाई टाकळी आणि लगतच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेतर्फे मनपाच्या बंद असलेल्या शाळेत नवीन ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. मनपाच्या सन 2026-27 या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा करण्यात आली.

झिंगाबाई टाकळी, मानकापूर, काळे ले-आउट, राऊत ले-आउट, साईनगर, गणपतीनगर, जुनी व नवीन झिंगाबाई टाकळी, गायत्रीनगर, बाबा फरीद नगर, गोधणी आणि जाफरनगर यांसारख्या मोठ्या परिसरात सध्या सुसज्ज ग्रंथालय नाही. या ४ किमीच्या परिघातील हजारो विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहराच्या दुसऱ्या भागात जावे लागते. मनपाने या भागातील विद्यार्थ्यांना होत असलेल्या अडचणी समजून या भागात बंद पडलेल्या महानगरपालिकेच्या शाळेची जुनी इमारत पाडून 3,900 स्क्वेअर फूट जागेत ई-ग्रंथालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. ग्रंथालयाच्या बैठकीत एकाच वेळी शंभर विद्यार्थी अभ्यास करू शकतील. या ई-लायब्ररीत स्पर्धा परीक्षा, साहित्य व विविध विषयांवरील आवश्यक संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

याशिवाय प्रोसेस सव्हेयर, स्वावलंबी नगर येथे पहिल्या मजल्याचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. तसेच तुकाराम लांजेवार मनपा शाळेत ई- ग्रंथालय, शहीद शंकर महल्ले शाळेत ई-ग्रंथालय, ठक्करग्राम येथे ई-ग्रंथालय, भुतेश्वरनगर येथील मनपा शाळेत ई-ग्रंथालयाचे बांधकाम केले जाणार आहे. तर कुणबीपुरा येथे रेणुकामाता ई-ग्रंथालयाचे निर्माण कार्य सुरु आहे. याकरिता महाराष्ट्र शासनाद्वारे निधी प्राप्त झाला आहे.

मनपातर्फे विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शांत अभ्यासाचे वातावरण उपलब्ध होऊन स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांमधील त्यांची गुणवत्ता व याशाचा टक्का वाढण्यास निश्चित मदत होईल. ग्रंथालय विभागासाठी सन 2026-27 मध्ये रु.18.00 कोटीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

Popular Articles