spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मातोश्री वृद्धाश्रमात ‘मेरा युवा भारत’ची पाच दिवसीय सेवा मोहीम उत्साहात संपन्न

– विद्यार्थिनींच्या सेवाभावी उपक्रमांनी वृद्धांना दिला आनंदाचा सहवास; सामाजिक बांधिलकीमचा आदर्श

गडचिरोली :- युवा पिढीमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करताना ज्येष्ठ नागरिकांना भावनिक आधार मिळावा, या उद्देशाने ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat), गडचिरोली यांच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात दि. २५ ते २९ जून २०२६ या कालावधीत पाच दिवसीय सेवा मोहिमेचे आयोजन करण्यात आले. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांनी ही मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या सेवा मोहिमेत निलिमा भारत धोडरे, सुप्रिया देवराव कंकलवार, प्रियंका राजू पेटकर, माधुरी रामदास हुलके आणि मयुरी पत्रूजी गेडाम या पाच विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवत त्यांना आनंददायी अनुभव दिला. हा उपक्रम ‘मेरा युवा भारत’, गडचिरोलीचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

मोहिमेच्या प्रारंभी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक गंगाधर चंदावार व सहाय्यक मधुकर लोणारे यांची परवानगी घेऊन विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. या अंतर्गत आजी-आजोबांसोबत गाणी म्हणणे, कथा सांगणे, गावांची नावे सांगण्याचा खेळ, मराठी कोडी, नृत्य तसेच विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विद्यार्थिनींना भरभरून प्रतिसाद दिला.

विद्यार्थिनींनी केवळ मनोरंजनात्मक उपक्रमांपुरते मर्यादित न राहता वृद्धांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या अनुभवांना जाणून घेत त्यांना भावनिक आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वृद्धाश्रमात आपुलकी, स्नेह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

पाच दिवस चाललेल्या या सेवा मोहिमेमुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. विद्यार्थिनींच्या सेवाभावी वृत्तीचे उपस्थित आजी-आजोबांनी मनापासून कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात पिढ्यांमधील संवाद आणि संवेदनशीलता अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली.

‘मेरा युवा भारत’च्या माध्यमातून राबविण्यात येणारे असे सामाजिक उपक्रम युवकांमध्ये सेवाभाव, नेतृत्वगुण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना विकसित करण्यास हातभार लावत असून समाजातील विविध घटकांमध्ये स्नेह, सहकार्य आणि परस्पर विश्वास वाढविण्यासही महत्त्वपूर्ण ठरत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.