spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चाचेर येथे शिक्षकांच्या कमतरतेविरोधात शाळा बंद आंदोलन

– ३२५ विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक; पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचा संताप

किशोर साहू, मौदा :- पीएम श्री उच्च प्राथमिक शाळा, चाचेर येथील शिक्षकांच्या तीव्र कमतरतेमुळे आणि शिक्षकांवर सोपविण्यात आलेल्या अशैक्षणिक कामांविरोधात आज शाळा बचाव समिती, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, पालक व विद्यार्थ्यांनी एकदिवसीय शाळा बंद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.

शाळेत इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंत ३२५ विद्यार्थ्यांची पटसंख्या असून ९ शिक्षकांची पदे आहेत. त्यापैकी ३ पदे रिक्त आहेत. सोमवार (ता. 7 जुलै) ला अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणासाठी ४ शिक्षक बाहेर गेले, तर ४ शिक्षकांना बीएलओची जबाबदारी देण्यात आल्याने शाळेत केवळ एकच शिक्षक उपस्थित होता. एका शिक्षकावर ३२५ विद्यार्थ्यांची जबाबदारी टाकणे अन्यायकारक असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

आंदोलनादरम्यान शाळेला पटसंख्येनुसार तातडीने शिक्षक उपलब्ध करून देणे, शिक्षकांवरील बीएलओ व इतर अशैक्षणिक कामांचा भार कमी करणे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता व नालीच्या कामामुळे नुकसान झालेल्या शाळेच्या संरक्षण भिंतीचे (वॉल कंपाऊंड) तातडीने पुनर्बांधकाम करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनात मौदा तालुका शाळा बचाव समितीचे उपाध्यक्ष किरण बरबटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवन सहारे, सदस्य रामकृष्ण आंबीलढुके, प्रफुल बडोले, राम दांडेकर, अमिता वैद्य, सुनील राऊत तसेच इतर सदस्य, ग्रामपंचायतीचे उपसरपंच रवींद्र ठाकरे, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी तालुका शाळा बचाव समितीचे उपाध्यक्ष किरण बरबटे यांनी इशारा देत सांगितले की, “शासनाने आमच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी,अन्यथा येत्या काळात शाळेला कुलूप ठोकून आंदोलन तीव्र करण्यात येईल.”


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.