spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अखेर मोर्शी तालुक्यातून बुस्टर कंपनीचे ‘हुतूतू’ सोयाबीन बियाणे तपासणीसाठी रवाना !

– राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तक्रारीनंतर प्रशासनाची हालचाल ! 

– नमुने प्रयोगशाळेत पाठविले, अहवाल तातडीने जाहीर करण्याची मागणी ! 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरणी करूनही उगवण न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या तक्रारीनंतर अखेर कृषी विभागाने बुस्टर कंपनीच्या ‘हुतूतू’ सोयाबीन बियाण्यांचे नमुने अधिकृत तपासणीसाठी प्रयोगशाळेत रवाना केले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाला कारवाई करावी लागल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

शेतकऱ्यांनी संबंधित बियाण्याच्या उगवणीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्यानंतर दिनांक ८ जुलै रोजी निर्भय कृषी मंदिर कृषी सेवा केंद्र मोर्शी येथील सोयाबीन बियाणे नमुने कृषी विभागाचे कृषी अधिकारी कार्यालयाचे गुण नियंत्रण अधिकारी दिनेश चौधरी, ,तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोर्शी पंचायत समिती येथील गुण नियंत्रण अधिकारी राहुल चौधरी, यांनी सर्वाधिक तक्रारी असलेल्या लॉट क्रमांकाचे नमुने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, गोपाल मंत्री, हितेश साबळे, उमेश राऊत, विवेक शहाणे, यांच्या उपस्थितीत सोयाबीन नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.

मोर्शी तालुक्यातील अनेक गावांमध्ये हजारो एकर क्षेत्रात या बियाण्याची पेरणी करण्यात आली होती. मात्र उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून बियाणे, खत, मजुरी, मशागत आणि वेळ यांचा मोठा आर्थिक फटका बसला असून “शेतकऱ्यांची फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालामध्ये बियाणे निकृष्ट दर्जाचे आढळल्यास बुस्टर कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला संपूर्ण आर्थिक भरपाई देण्यात यावी. संबंधित लॉटची विक्री तात्काळ बंद करून राज्यभर चौकशी करण्यात यावी. दोषी अधिकारी, वितरक व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बियाणे विक्रीपूर्वी गुणवत्ता तपासणी अधिक कडक करण्यात यावी अशी मागणी करून ८ दिवसाच्या आत बोगस सोयाबीन बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला न मिळण्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांचा संताप; जबाबदार कोण?

बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सोयाबीन बियाण्यांची गुणवत्ता योग्य प्रकारे तपासली गेली असती, तर आज हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली नसती. त्यामुळे केवळ बियाणे कंपनीच नव्हे तर गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांच्या नजरा आता अहवालाकडे ! 

संपूर्ण मोर्शी तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष आता प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लागले आहे. अहवालातून सत्य समोर येऊन दोषींवर कठोर कारवाई होईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नसून, जबाबदारांवर कठोर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरू राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.