spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सार्वजनिक ठिकाणांवर वॉटर एटीएम सुरू करणार

– जलप्रदाय विशेष समितीचा स्तुत्य निर्णय

नागपूर :- उद्याने, मैदाने, बस स्थानके यासह इतर सार्वजनिक ठिकाणांवर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम उभारण्याचा निर्णय जलप्रदाय विशेष समितीने घेतला आहे.

जलप्रदाय विशेष समितीची बैठक सभापती दिव्या धुरडे यांच्या अध्यक्षतेखाली (ता. 9) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पार पडली. यावेळी उपसभापती विजय (पिंटू) झलके, नासुप्रचे विश्वस्त व नगरसेवक शेषराव गोतमारे, नगरसेविका मंजुषा चाचेरकर, नगरसेविका तसनीम परवीन ताजी, नगरसेवक सुहास नानवटकर, नगरसेवक रामदास शाहू यांच्यासह अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर व ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते.

जलप्रदाय विशेष समितीच्या सभापती दिव्या धुरडे यांनी सार्वजनिक ठिकाणी वॉटर एटीएम मशीन लावण्याचा प्रस्ताव मांडला. यासंदर्भात समितीच्या सदस्यांना मशीनचे सादरीकरण करण्याची सूचना पिंटू झलके यांनी केली. या मशीनच्या सादरीकरणावर प्रस्ताव तयार करण्याचे निश्चित करण्यात आले.

बिल भरणा केंद्रांमध्ये वाढ

पाण्याचे बिल भरण्यासाठी नागरिकांसाठी शहरात केवळ 25 बिल भरणा केंद्र आहेत. यात वाढ करण्याची सूचना विजय (पिंटू) झलके यांनी केली. शहरात 250 पर्यंत बिल भरणा केंद्र सुरू केल्यास नागरिकांना सोईचे होईल तसेच पाणी कराची वसुलीत वाढ होईल, अशी सूचना त्यांनी केली. त्याचप्रमाणे पाण्याचे बिल भरण्यासाठी ई-वॉलेटची व्यवस्था करण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

शहरातील सार्वजनिक विहीरींची साफसफाई करण्याच्या संदर्भात आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे रस्त्यावर खोदकाम करून जलवाहिनीला हानी पोहोचविणाऱ्यावर पोलिसमध्ये तक्रार करण्याचे यावेळी सुचविण्यात आले. अनेकदा कोणतीही पूर्वसूचना न देता मोबाईल कंपन्या किंवा इतर विकास संस्था रस्त्यावर खोदकाम करून जलवाहिनीला हानी पोहोचवित असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. यासंदर्भात मनपाने कडक पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे सभापती दिव्या धुरडे यांनी सांगितले. समितीच्या सदस्यांनी सांगितलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्वरित निपटारा करण्यात यावा, अशी सूचना यावेळी करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.