spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विधानपरिषद विविध क्षेत्रांतील मान्यवरांना प्रतिनिधित्व देणारे प्रभावी व्यासपीठ – सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई :- विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना लोकशाही आणि प्रशासकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

विधान परिषद सदस्यत्वाची मुदत पूर्ण झाल्याने निवृत्त होणाऱ्या सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या पाच सदस्यांना सभागृहात निरोप देताना ते बोलत होते.

सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, देशातील मोजक्याच राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात असून महाराष्ट्रालाही ही परंपरा लाभली आहे. समाजातील विविध क्षेत्रांतील अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तींना लोकशाही प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विधान परिषद करत आहे.

कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सदस्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्याची समृद्ध संसदीय परंपरा या सभागृहाने जपली आहे.

सतीश चव्हाण यांनी शिक्षण, तरुणांचे प्रश्न आणि रोजगाराच्या विषयांवर सातत्याने प्रभावी भूमिका मांडली. विविध शैक्षणिक व विधानमंडळाच्या समित्यांवरील त्यांचा अनुभव सभागृहासाठी मोलाचा ठरल्याचे सभापतींनी नमूद केले. जयंत आसगावकर यांनी शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सातत्याने सभागृहात मांडले. शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक विषयांवरील त्यांचा अभ्यास आणि शांत, संयमी संसदीय शैली प्रेरणादायी असल्याचे सभापती म्हणाले.

अभिजित वंजारी यांनी कायदेशीर, सामाजिक प्रश्न प्रभावीपणे उपस्थित केले. संसदीय आयुधांचा प्रभावी वापर आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्वामुळे त्यांनी सभागृहात वेगळी छाप पाडल्याचे सभापतींनी सांगितले.

अरुण लाड यांनी सहकार, शेती आणि ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सातत्याने मांडले. दुष्काळग्रस्त भागातील पाणीप्रश्न आणि सहकार क्षेत्रातील विषयांवर त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे सभापतींनी नमूद केले.

किरण सरनाईक यांनी शिक्षक, विनाअनुदानित शाळा आणि शैक्षणिक संस्थांचे प्रश्न सातत्याने सभागृहात मांडले. त्यांचा मनमिळावू स्वभाव, व्यापक जनसंपर्क आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असल्याचे सभापतींनी सांगितले.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या सर्व सदस्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत, ते पुढेही विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवा करत राहतील, असा विश्वास व्यक्त केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.