सिटूतर्फे आशा वर्कर्सचे मुक आंदोलन

0
19

– केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी:

नागपूर :- सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU) संलग्न आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन, नागपूर जिल्ह्याच्या वतीने रविवारी संविधान चौक येथे मुक आंदोलन करण्यात आले. आंदोलना दरम्यान आशा वर्कर्सनी तोंडावर मास्क लावून, हातात तिरंगा ध्वज घेऊन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कॉ. राजेंद्र साठे, कॉ. प्रीती मेश्राम आणि कॉ. रंजना पौनीकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनात मोठ्या संख्येने आशा वर्कर्स सहभागी झाल्या. आंदोलनाची शांततापूर्ण व वेगळी पद्धत पाहून उपस्थित नागरिक आणि माध्यमांचे लक्ष वेधले गेले. यावेळी बोलतांना कॉ. राजेंद्र साठे यांनी नीट (NEET) प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. यावेळी दिल्लीतील आंदोलनांबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडत,आंदोलकांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांना दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. आंदोलनात कॉ. विठ्ठल जुनघरे, कॉ. प्रमोद कावळे, कॉ. उज्वला कांबळे, संजय अंभोरे, नालंदा गणवीर यांच्यासह अनेक पदाधिकारी व आशा वर्कर्स उपस्थित होत्या.