खापा, वार्ताहर :- जिजामाता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, खापा येथे विद्यार्थ्यांसाठी “गुड टच–बॅड टच, अमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि वाहतूक नियम” या विषयांवर जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे पालन, सामाजिक जबाबदारी आणि सुरक्षित नागरिक म्हणून वावरण्याचे महत्त्व पटवून दिले.
लहू कोरडे यांनी “गुड टच–बॅड टच” या विषयावर मार्गदर्शन करत सुरक्षित व असुरक्षित स्पर्शातील फरक, स्वतःचे संरक्षण करण्याचे उपाय तसेच अयोग्य प्रकार घडल्यास विश्वासू व्यक्तीला त्वरित माहिती देण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक सचिन जंगम यांनी अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करत व्यसनामुळे आरोग्य, शिक्षण आणि भविष्यात होणारे गंभीर परिणाम स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहून निरोगी व जबाबदार जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी केले.
वाहतूक पोलीस सुधीर यादगीरे यांनी वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वाहतूक सिग्नलचे महत्त्व तसेच अल्पवयीनांनी वाहन चालवू नये याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना मोहने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुधाकर गजभिये होते. ज्येष्ठ शिक्षिका मुक्ता कडू यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचा समारोप राजेंद्र भोंगाडे यांनी आभार प्रदर्शनाने केला.
या जनजागृती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बालसुरक्षा, व्यसनमुक्ती आणि वाहतूक सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली. उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



