तृतीयपंथींना आयुष्यमान भारत कार्ड देण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करावे – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

0
23

नागपूर :- विभागातील तृतीयपंथींना आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वितरीत होण्याकरिता विशेष शिबीरांचे आयोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

नागपूर विभागातील तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाची बैठक बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली, यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. सामाजिक न्याय विभागाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, पुरवठा उपायुक्त अनिल बन्सोड, तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाच्या विद्या कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

तृतीयपंथींना आरोग्य विषयक सेवा पुरविण्यासाठी प्राधान्याने लक्ष देवून त्यांना आयुष्यमान भारत कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष शिबीरांचे आयेाजन करण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी यावेळी दिल्या. तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून तृतीयपंथींना केटरिंग, टेलरिंग, ड्रायव्हिंग आदींचे प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. तृतीयपंथींना प्रदान करण्यात आलेले राष्ट्रीय ओळखपत्र, आधारकार्ड, मतदानकार्ड, राशनकार्ड, ई-रिक्शा, घरकूल, आरोग्यविमा आदींची माहिती यावेळी देण्यात आली.