“गड्डे समाधी आंदोलन” – प्रशासन हलले, आंदोलकांना अटक!
आम आदमी पार्टी तर्फे नागपूरच्या गणेशपेठ मुख्य बस स्टँड चौक येथे आज ” गड्ड्यात समाधी आंदोलन” करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही, सदर परिसरातील खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत.
पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचते व नागरिकांना त्याची खोली कळत नाही. परिणामी, अनेक अपघात होतात, लोक जखमी होतात. या गंभीर समस्येकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत असल्याने, आज आम आदमी पार्टी नागपूर शहर तर्फे तीव्र स्वरूपात “गड्डे समाधी आंदोलन” करण्यात आले.
परंतु, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच प्रशासन कामाला लागले आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला आंदोलनाची समाधी घेण्याआधीच ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे नागपूर शहर संघटनमंत्री गिरीश तितरमारे यांनी केले. त्यांच्या सोबत नागपूर संघटनमंत्री रोशन डोंगरे, नागपूर उपाध्यक्ष प्रशांत अहिरराव, सह संघटन मंत्री जॉय बांगडकर, संघटन मंत्री सचिन लोणकर, मनोज डोंगरे, शिरीष तिडके, ज्योतीताई गौर, अल्का पोपटकर, पुष्पा डाभरे, शारदाताई गौर रितू तिवारी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमची मागणी एकच – नागपूर शहरातील रस्ते तात्काळ दुरुस्त करा, खड्डे बुजवा!
लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्क्रिय प्रशासनाविरोधात आमचा लढा सुरूच राहील.




