spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठीच्या शुक्रवारी आठवडी बाजारात अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

– उघड्यावर खाद्यपदार्थांची सर्रास विक्री; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची नागरिकांची मागणी 

संदीप कांबळे,कामठी :- कामठी शहरातील शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार हा परिसरातील हजारो नागरिकांसाठी खरेदीचे प्रमुख केंद्र आहे. मात्र, या बाजारात उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याने अन्नसुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विविध प्रकारचे फराळ, मिठाई, समोसे, भजी, वडे, जलेबी तसेच इतर तयार खाद्यपदार्थ कोणतेही संरक्षण न ठेवता विक्रीसाठी मांडले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, उघड्यावर ठेवलेल्या खाद्यपदार्थांवर धूळ, माशा तसेच इतर बाह्य घटकांचा संपर्क येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दर शुक्रवारी हजारो नागरिक या बाजारात खरेदीसाठी येतात. त्यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे विक्री होणारे खाद्यपदार्थ अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांनुसार आहेत का, याची नियमित तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, अन्न व औषध प्रशासनाने आठवडी बाजारात अचानक तपासणी मोहीम राबवून खाद्यपदार्थांचे नमुने तपासावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करताना ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची खात्री करावी.

कामठीसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे. त्यामुळे अन्नसुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून आठवडी बाजारातील खाद्यपदार्थांच्या विक्रीवर नियमित देखरेख ठेवावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.