हिंगणा :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त हिंगणा येथील अहिल्या किड्स प्री- प्रायमरी स्कूलमध्ये पारंपरिक वारी-दिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची वेशभूषा परिधान करून विठ्ठलभक्तीचा अनोखा आविष्कार सादर केला. टाळ, मृदुंग, भगवे ध्वज, तुळशी वृंदावन आणि पालखीच्या सहभागाने काढण्यात आलेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी विठ्ठल” अशा नामघोषाने परिसर भक्तिमय केला. विठ्ठल-रुक्मिणी, संत आणि वारकरी यांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार, भक्ती, संस्कार, एकता आणि सामाजिक मूल्यांची माहिती सोप्या भाषेत देण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आणि भारतीय संस्कृतीची अनुभवातून ओळख झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत शाळेच्या या संस्कारक्षम उपक्रमाचे स्वागत केले. आनंद, भक्ती आणि संस्कारमय वातावरणात संपन्न झालेल्या या वारी- दिंडीने आषाढी एकादशीचा उत्सव अविस्मरणीय ठरला.





