– प्रतिबंधित क्षेत्रात वावर महागात; नवीन कामठी पोलिसांची धडक कारवाई
कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ क्र. 6 चे पोलीस उपायुक्त यांनी दोन वर्षांसाठी भंडारा जिल्ह्यात हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारास नवीन कामठी पोलिसांनी प्रतिबंधित क्षेत्रात फिरत असताना रंगेहाथ अटक केली. हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हद्दपार आरोपी इस्माईलपुरा परिसरात वावरत असल्याची खात्री झाल्यानंतर नवीन कामठी पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. इस्माईलपुरा येथील ‘गुड्डू चाय’ टपरीजवळून आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव बादल संजय संतापे (वय 28), रा. विक्तुंबबा नगर, कामठी असे आहे. पोलीस उपायुक्तांच्या हद्दपारीच्या आदेशानंतरही तो प्रतिबंधित क्षेत्रात फिरत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
सराईत गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन कामठी पोलीस सातत्याने विशेष मोहीम राबवत असून, हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस निरिक्षक महेश आंधळे यांनी सांगितले.





