spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बदली आदेशानंतरही पोलीस कर्मचारी मूळ ठाण्यातच ?

– पांढरकवडा पोलीस ठाण्यात आदेशाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह

पांढरकवडा :- यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी २३ मे २०२६ रोजी जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे स्पष्ट निर्देश आदेशात देण्यात आले होते. मात्र, पांढरकवडा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नसल्याची चर्चा असून, त्यामुळे बदलीचे आदेश प्रत्यक्षात रखडल्याचे बोलले जात आहे.

माहितीनुसार, बदली आदेशानंतर नियमानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना साधारणतः ७ ते १५ दिवसांच्या आत कार्यमुक्त करून नव्या ठिकाणी रुजू होण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित असते. मात्र, आदेशाला दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही काही कर्मचारी मूळ ठाण्यातच कार्यरत असल्याचे समोर येत आहे.

स्थानिक स्तरावर अशीही चर्चा आहे की, एका कर्मचाऱ्याची पाटण पोलीस ठाण्यात बदली होऊनही तो गेल्या सुमारे दहा वर्षांपासून पांढरकवडा पोलीस ठाण्यातच कार्यरत असून, पुन्हा एक वर्ष मुदतवाढ मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, दुसऱ्या एका कर्मचाऱ्याची वणी येथे बदली झाल्यानंतरही तो पांढरकवड्यातच राहण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. आणखी एका कर्मचाऱ्याची पारवा येथे बदली झाली असतानाही त्यालाही अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, बदली आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असे आदेशात नमूद करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणती कारवाई करण्यात आली आहे का, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. बदलीचे आदेश पूर्णपणे राबवले जाणार का? या प्रकाराची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचली आहे का? तसेच आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत यवतमाळ जिल्हा पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका काय असेल, तसेच बदली प्रक्रियेला गती देण्यासाठी कोणती पावले उचलली जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.