spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हयात प्रमाणपत्राशिवाय ₹१,५०० चा लाभ धोक्यात !

– संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी तातडीने हयात प्रमाणपत्र सादर करावे : अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार 

पंकज परशुरामकर, इनसाइडर न्युज टुडे,

नवेगाव बांध :- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील हजारो लाभार्थ्यांसाठी महसूल प्रशासनाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. अद्याप हयातीचे प्रमाणपत्र (लाईफ सर्टिफिकेट)सादर न केलेल्या लाभार्थ्यांनी कोणताही विलंब न करता शासनमान्य सेतु केंद्रातून हयात प्रमाणपत्र तयार करून संबंधित कार्यालयात जमा करावे. अन्यथा शासनाकडून दरमहा मिळणारा ₹१,५०० चा आर्थिक लाभ बंद होण्याची शक्यता असल्याची माहिती अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी दिली आहे.

महसूल विभागाच्या माहितीनुसार, शासनाच्या नियमानुसार संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यास दरवर्षी हयातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. या प्रमाणपत्राद्वारे लाभार्थी हयात असल्याची अधिकृत नोंद अद्ययावत केली जाते. मात्र, अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने त्यांचे मासिक अनुदान थांबण्याचा धोका निर्माण झाला आहे.

लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक फटका बसू नये आणि शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ अखंडितपणे सुरू राहावा, यासाठी आवश्यक कागदपत्रांसह तातडीने जवळच्या शासनमान्य सेतु केंद्रात जाऊन हयात प्रमाणपत्र तयार करून संबंधित महसूल कार्यालयात सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. वेळेत प्रमाणपत्र सादर केल्यास लाभ नियमित सुरू राहील आणि अनावश्यक अडचणी टाळता येतील.

हयात प्रमाणपत्र सादर करण्यात दिरंगाई झाल्यास किंवा प्रमाणपत्र सादर न केल्यास शासनाकडून मिळणारा मासिक आर्थिक लाभ थांबू शकतो. त्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांसाठी संबंधित लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील, असा स्पष्ट इशाराही महसूल विभागाने दिला आहे.

तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले की, शासनाच्या निर्देशानुसार हयात प्रमाणपत्राची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी या सूचनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने हयात प्रमाणपत्र तयार करून सादर करावे. तसेच ग्राम महसूल अधिकारी, तलाठी व संबंधित यंत्रणांनीही लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवून कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील ज्या लाभार्थ्यांनी अद्याप हयात प्रमाणपत्र सादर केलेले नाही, त्यांनी तातडीने शासनमान्य सेतु केंद्रातून हयात प्रमाणपत्र तयार करून संबंधित कार्यालयात जमा करावे. प्रमाणपत्र सादर करण्यात विलंब झाल्यास शासनाकडून मिळणारा मासिक आर्थिक लाभ थांबू शकतो. कोणताही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करावी.

— भगवान नंदागवळी

ग्राम महसूल अधिकारी, नवेगाव बांध


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.